मर्चंट नेव्हीत नोकरीच्या आमिषाने लाखोंचा गंडा

मर्चंट नेव्हीत नोकरीच्या आमिषाने लाखोंचा गंडा

सांगली - मर्चंट नेव्हीत शंभर टक्के नोकरीचे आमिष दाखवून परराज्यातील सुशिक्षित बेरोजगार  तरुणांना लाखोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. फसवणूक झाल्याने परराज्यातील तरुणांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली.

त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरू केली असून  रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. तक्रारी अर्जाची चौकशी सुरू असून दोषीवर कारवाई केली जाईल, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

अधिक माहिती अशी, की कर्नाटकसह गोव्यात मर्चंट नेव्हीत शंभर टक्के नोकरी अशी जाहिरातबाजी करून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गळाला लावले जात. त्या तरुणांना विश्रामबागमधील हरमोनी रेसिडन्स्‌मध्ये चौगुले मरीन एज्युकेशन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणून मोठी स्वप्ने दाखवली जात होती. या इन्स्टिट्यूटमध्ये आल्यानंतर चौगुले नामक व्यक्ती मर्चंट नेव्हीत असल्याचे सांगून विद्यार्थ्यांसह पालकांना नोकरीचे आमिष दाखवत होता. यासाठी २५ विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी प्रत्येकी एक लाख ६० हजार रुपये दिले.

त्यानंतर हसनी अश्रम येथील  ट्रेनिंग सेंटरवर अडीच महिने ट्रेनिंग देण्यात येईल, असे सांगण्यात आले. तेथे दाखल झालेली सर्व विद्यार्थी कर्नाटक, बेळगाव, तमिळनाडू, आंध्रप्रदेशसह गोव्यातील आहेत. अडीच महिन्यांनंतर त्यांना काही प्रमाणपत्रही देण्यात आली. मात्र, सहा महिने उलटून गेले, तरी नोकरीचा पत्ता नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी जाब विचारण्यास सुरवात केली. त्यावेळी तेथील कर्मचाऱ्यांनी दमबाजी केली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पालकांना सांगितले. 

दरम्यान, विश्रामबाग येथील इन्स्टिट्यूटजवळ विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. त्यावेळी विश्रामबाग पोलिस घटनास्थळी धावले. त्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दिली. पोलिसांकडून चौकशी सुरू असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. 

कपडे अन्‌ ट्रेनिंग 
दाखल विद्यार्थ्यांना नेव्ही स्टाईलचे कपडे देऊन फोटो सेशनही केले जात होते. त्यांना ट्रेनिंग सेंटरवर पोहणे, धावणेसह विविध सैन्य दलाचे ट्रेनिंगही दिले जात होते. या वेळी मानसिकसह शारीरिक छळ केला जात असल्याचे, विद्यार्थ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com