15 मुद्यांच्या आधारे सोलापुरातील झेडपी शाळांची तपासणी

संतोष सिरसट
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

- गणवेश व ब्लेझरचा मुद्दा तिसरा
- माहिती देताना गुरुजींचा लागणार कस 
- संघटनांच्या भूमिकेकडेही लक्ष 

 

सोलापूर- दिवाळीच्या सुटीनंतर यंदाच्या वर्षातील दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सोमवारपासून (ता. 19) सुरवात होत आहे. सुटीनंतरच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळांची 15 मुद्यांच्या आधारे तपासणी केली जाणार आहे. सध्या गाजत असलेला गणवेश व ब्लेझरच्या मुद्याचा समावेश तपासणीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ही 15 मुद्यांची माहिती देताना गुरुजींचा मात्र कस लागणार आहे. 

जिल्हा परिषद शाळा व त्यावरील गुरुजींची संख्या जास्त असल्याने ते नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मागील दोन महिन्यांपासून गुरुजींचा ड्रेसकोड व ब्लेझरचा मुद्दा गाजत आहे. काहीही झाले तरी ब्लेझर घालावाच लागेल, अशी भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी घेतली आहे. मात्र, त्याला जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे. संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांची भेट घेतली होती. पण, त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचे डॉ. भारुड यांनी घेतलेल्या भूमिकेवरून दिसून येते. त्यामुळे 15 मुद्यांच्या आधारे शाळांची तपासणी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 

या मुद्यांच्या आधारे होणार तपासणी 
शाळांची तपासणी करताना शाळेचे नाव, एकूण शिक्षक संख्या, गणवेश व ब्लेझरमध्ये उपस्थित असलेल्या शिक्षकांची संख्या, शाळा भेटी संख्या, विद्यार्थी हजेरी, पट व उपस्थिती, डिजिटल शाळा, उपस्थिती भत्ता लाभार्थी मुलींची संख्या, मोफत गणवेश व पाठ्यपुस्तक योजना, शालेय पोषण आहार, शाळा सिद्धी, शालेय आरोग्य तपासणी, पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या मुद्यांचा समावेश आहे. 

संघटनांच्या भूमिकेकडे लक्ष 
डॉ. भारुड यांनी ब्लेझर घालावाच लागेल, अशी भूमिका घेतल्याने संघटनेच्या नेत्यांची पंचाईत झाली आहे. शाळा सुरू होण्यास काही तासांचाच अवधी शिल्लक असल्याने नेमके करायचे तरी काय? अशी स्थिती गुरुजींची झाली आहे. याबाबत संघटना काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Checking of ZP schools in Solapur based on 15 points