धडपड रसायनमुक्त द्राक्षांसाठी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

सांगली - द्राक्ष उत्पादनात राज्यात नाव मिळविलेले शेतकरी आता रसायनमुक्ती शेतीच्या मागे लागले आहेत. रसायनांना फाटा देत सेंद्रिय द्राक्षांसाठी वेगवेगळे प्रयोग जिल्ह्यात सध्या सुरू झाले आहेत. स्वानुभवाने सिद्ध झालेली देशी औषधे आणि सेंद्रिय घटक बागेत वापरले जात आहेत. हमखास पैसा देणाऱ्या द्राक्षाने बळीराजाला चांगले दिवस आणले आहेत.

सांगली - द्राक्ष उत्पादनात राज्यात नाव मिळविलेले शेतकरी आता रसायनमुक्ती शेतीच्या मागे लागले आहेत. रसायनांना फाटा देत सेंद्रिय द्राक्षांसाठी वेगवेगळे प्रयोग जिल्ह्यात सध्या सुरू झाले आहेत. स्वानुभवाने सिद्ध झालेली देशी औषधे आणि सेंद्रिय घटक बागेत वापरले जात आहेत. हमखास पैसा देणाऱ्या द्राक्षाने बळीराजाला चांगले दिवस आणले आहेत.

अपवाद वगळता निसर्गानेही साथ दिल्याने जिल्ह्याच्या पूर्व भागात हजारो एकरमध्ये बागा फुलल्या. उत्पादनात स्थैर्य मिळविल्यानंतर आता अधिकाधिक निर्दोष, रसायनमुक्त द्राक्षांसाठी प्रयोग सुरू आहेत. ती दर्जेदार होतील, यासाठी स्पर्धाच सुरू आहे. द्राक्ष टपोरी, चमकदार तितका जास्त दर; हे लक्षात घेऊन चक्क ठिबक सिंचनातून किंवा फवारणीतून दुधाचा वापर केला जात आहे.

काही दिवसांपूर्वी दूध आंदोलन झाले, तेव्हा शिल्लक दूध शेतकऱ्यांनी बागेत फवारले. यातून द्राक्षे तजेलदार, चमकदार आणि टपोरे बनत असल्याचे शेतकऱ्यांचे निरीक्षण आहे. आपत्तीतून उत्पत्ती अशी संधी या संपाने साधली. किडीच्या बंदोबस्तासाठी शेकडो औषधे बाजारात आहेत. भोसे, सोनी भागातील प्रयोगशील शेतकरी ती टाळून घरगुती आणि सेंद्रीय घटक वापरत आहेत. सोयाबीन, शेंग किंवा करंजीची पेंड वेलीच्या मुळाशी टाकतात; यामुळे द्राक्षमण्यांची चकाकी वाढते. बाजारात दीर्घकाळ टिकतात; दरही मिळतो.

घड टिकण्यासाठी वेलीची ताकद वाढावी लागते; त्यासाठी कच्ची अंडी मुळाजवळ फोडतात. कॅल्शियम वाढीने वेलीला अधिकाधिक घड पेलता येतात. द्राक्षमणी फुगत असल्याचेही शेतकऱ्यांचे अनुभव आहेत. ठिबकमधून हळद देऊन वेलीची अन्नग्रहण क्षमता वाढवली जाते; अन्ननलिका स्वच्छ राहतात. सोयाबीन, शेंगपेंड व मक्‍याचा भरडा वापरल्याने द्राक्ष उतरणीनंतर बाग सुकत नाही.

काही शेतकरी हरभराडाळीचे पीठ ठिबकमधून सोडतात; यामुळे द्राक्षांना गर्द हिरवा व पिवळसर आकर्षक रंग येतो. विशेषतः निर्यातक्षम द्राक्षांसाठी हा प्रयोग केला जातो. गोमूत्र मिश्रीत औषध फवारल्याने किडीचा बंदोबस्त होतो. मालगाव, मणेराजुरी, कवलापूर भागातील शेतकरी कडुलिंबाचा रस औषधात वापरतात; यामुळे वेलीत कडवटपणा येतो; कीड लागत नाही. द्राक्षांची गोडी वाढण्यासाठी, वेलीत कॅल्शियम वाढीसाठी गुळाचा वापरही सर्रास होतो.

रसायनमुक्त द्राक्षांसाठी शेतकऱ्यांनी जणू मोहीमच सुरू केली आहे. निर्यातीची द्राक्षे रसायनांमुळे परदेशांत नाकारली गेली; त्यातून कोट्यवधींचा फटका बसला. शहाण्या झालेल्या शेतकऱ्यांनी रसायनमुक्तीचे प्रयोग सुरू केले. त्यांना चांगले यश मिळत आहे.

- राजेंद्र बोदगीरे, प्रयोगशील द्राक्ष शेतकरी, मालगाव

Web Title: chemical-free grapes