राजाराम महाराज जयंती : सामाजिक, आधुनिक विकासात भरीव योगदान देणारा राजा

राजाराम महाराज जयंती : सामाजिक, आधुनिक विकासात भरीव योगदान देणारा राजा

कोल्हापूर -  ज्याने खूप मोठे काम केले, पण त्याबद्दल खूप कमी लिहिले गेले, अशा छत्रपती राजाराम महाराजांच्या जयंतीलाही मोठ्या सोहळ्याचे स्वरूप येण्याची गरज आहे. छत्रपती शाहू महाराजांनी जो भक्कम पाया रचला, त्यावर कळस उभा करण्याचे काम राजाराम महाराजांनी केले. पण, खूप मोठे काम करूनही ते तसे बाजूलाच राहिले. 

छत्रपती शाहू महाराजांचे मोठे चिरंजीव राजाराम महाराज. त्यांची सारी जडणघडण शाहूंच्या विचारातून झाली आणि त्यांनी कोल्हापूर संस्थानात सामाजिक आणि आधुनिक विकासाची शृंखलाच तयार केली. 

कोल्हापुरात विमान आले किंवा कोल्हापुरात विमानतळ सुरू झाले ते छत्रपती राजाराम महाराज यांच्याच काळात. मुडशिंगी, सरनोबतवाडीच्या हद्दीवरील उदासीबुवाचा माळ म्हणून असलेल्या माळावरील १७० एकर जागा त्यांनी विमानतळाला दिली व त्यामुळेच कोल्हापुरात विमानसेवा सुरू झाली. या विमानतळावरून पहिल्या विमानाने झेप राजाराम महाराजांच्या उपस्थितीतच घेतली.

शाहू महाराजांनी राधानगरी धरणाचा पाया घातला. एका विशिष्ट टप्प्यापर्यंत धरणाचे बांधकाम नेले. पण, पुढे आर्थिक अडचणींमुळे धरणाचे बांधकाम थांबले. शाहूंच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांनीच धरणाचे काम पूर्णत्वाला नेले.
सामाजिक क्षेत्रात राजाराम महाराजांनी शाहूंचे विचार प्रत्यक्ष कृतीतून पुढे नेले. बालविवाहाची प्रथा बंद करण्यात त्यांचा पुढाकार राहिला. बालविवाह करणाऱ्याला त्याकाळात दोन हजार रुपये दंड, लग्न ठरविण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांना दोनशे रुपये दंड व बालविवाहाची माहिती देणाऱ्यांना २५ रुपये बक्षीस असा आदेशच काढला. त्यामुळे जख्खड म्हातारे व बालवधू असले विसंगत विवाह बंद झाले. 

बिंदू चौकात शाहू वैदिक विद्यालयाची स्थापना राजाराम महाराजांनीच केली. वैदिक पद्धतीने पौराहित्य करण्यासाठी त्यांनी प्रेरणा दिली. हे वैदिक विद्यालय निवासी पद्धतीने सुरू झाले. आजही हे वैदिक विद्यालय कार्यरत आहे. राजाराम महाराजांनी अनिष्ट धार्मिक प्रथा-परंपरावर कारवाईचे आदेश देऊन निर्बंध आणले. त्या काळात काही धार्मिक विधीत रेड्याचा बळी दिला जात असे. तो प्रकार त्यांनी बंद केला.

शिक्षणक्षेत्रातही त्यांची कामगिरी खूप महत्त्वाची ठरली. पारंपरिक शिक्षणाऐवजी व्यावसायिक शिक्षण घेऊन नवी पिढी तयार व्हावी, म्हणून त्यांनी शिवाजी टेक्‍निकल स्कूलची सुरवात केली. त्यासाठी सुंदर इमारत अयोध्या, शाहू, पद्मा टॉकीजसमोर बांधली. आजही तेथे तंत्रशिक्षण दिले जाते. 

कोल्हापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात राजाराम महाराजांनी भरीव योगदान दिले. पण त्यांची स्वतंत्र ओळख कमी राहिली आहे. त्यामुळे राजाराम महाराज व शाहू महाराज यांच्या छायाचित्रातला फरक न कळणारे कोल्हापुरातच अनेक जण आजही आहेत. त्यांचा पुतळा व्हीनस कॉर्नरला आहे. त्यामुळे तो चौक राजाराम महाराज चौक असाच ओळखणे आवश्‍यक आहे. पण, व्हीनस कॉर्नर अशीच त्या चौकाची ओळख आजही आहे. राजाराम महाराजांचे नाव विमानतळाला देण्यात येणार आहे. पण, त्या निमित्ताने विमानतळासाठी राजाराम महाराजांनी त्याकाळी केलेले काम नव्या पिढीसमोर येण्याची गरज आहे. 

राजाराम महाराजांकडून अनेक वास्तूंचे बांधकाम
कोल्हापुरात बी. टी. कॉलेज, ट्रेझरी, शिवाजी टेक्‍निकल, स्काऊट बंगला या ज्या देखण्या वास्तू आहेत, त्याची उभारणी राजाराम महाराजांच्या काळातच झाली. दसरा चौकातील शाहू महाराजांचा पुतळा देखरेखीखालीच उभा राहिला. कोल्हापुरातल्या सर्वांत मोठ्या आर्थिक उलाढालीचे केंद्र असलेली लक्ष्मीपुरी राजाराम महाराजांच्या काळातच आकाराला आली. लक्ष्मीपुरी व शाहूपुरीला जोडणारा विल्सन पूल राजाराम महाराजांच्या काळातच बांधला गेला. 

दगडी तक्का आणि राजाराम महाराज
दसरा चौकात शाहू महाराजांचा पुतळा राजाराम महाराजांच्या देखरेखीखाली उभा केला. त्यावेळी पुतळ्याचे काम पाहण्यासाठी राजाराम महाराज दसरा चौकात एका दगडी तक्‍क्‍यावर येऊन बसत होते. चौकात साधना हॉटेलशेजारी आजही हा दगडी तक्का आहे. जुने लोक आजही जाता-येता त्या दगडी तक्‍क्‍याला सलाम करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com