#ShahuMaharajJayanti युवा शिल्पकारांचे असेही शाहूकार्य!

#ShahuMaharajJayanti युवा शिल्पकारांचे असेही शाहूकार्य!

कोल्हापूर -  गुलामगिरीतून शूद्रातिशूद्रांची मुक्तता करण्यासाठी सामाजिक क्रांतीची पताका स्वतःच्या खांद्यावर घेऊन कार्य करणारे महाराजांचे महाराज शाहू महाराज, अशी राजर्षी शाहूंची जगभर ओळख. त्यांच्या विचारांचा जागर विविध माध्यमांतून सुरू असतोच, पण राजर्षी शाहूंचे छोटे आणि सुबक पुतळे घरोघरी विराजमान व्हावेत, यासाठी येथील युवा शिल्पकार मंडळींचे प्रयत्न सुरू आहेत.

 युवा शिल्पकार ओंकार कोळेकर याने काही वर्षांपूर्वी महाराजांचे छोटे पुतळे तयार केले. त्यानंतर आता सत्यजित निगवेकर याने महाराजांचे तीनफुटी पुतळे तयार केले असून, राज्यभरातून त्याला मागणी वाढली आहे. फायबर, मेटल आणि प्लास्टर अशा तिन्ही माध्यमांत त्याने हे पुतळे साकारले असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची माहिती सर्वत्र शेअर केली. त्याला एकाच महिन्यात राज्यभरातील विविध ठिकाणांहून ऑर्डर आल्या आहेत. ते सांगतो, ‘‘मोठ्या आकाराचे पुतळे अनेक ठिकाणी मिळतात; पण प्लास्टर सोडून  मेटल व फायबरमध्ये लहान पुतळे फारसे कुठे मिळत नाहीत आणि जे मिळतात, त्याच्या किमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नसतात. त्यामुळे तीन फुटांचे पुतळे तिन्ही माध्यमात तयार केले आहेत.’’ 

दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूटमधून कलाशिक्षण पूर्ण केलेला मंगळवार पेठेतील केतन पायमल याने नुकताच एक नावीन्यपूर्ण दीड फूट उंचीचा पुतळा साकारला आहे. अगदी सुबक आणि देखणा असा हा पुतळा असून, त्यासाठी खास राजदरबारी पेहराव तयार करून घेतला. त्यामुळे या पुतळ्याचा थाट काही औरच आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना पहिला पुतळा तो भेट देणार आहे. अशा पद्धतीचे पुतळे तो लवकरच सर्वांसाठी उपलब्ध करणार आहे.   

शास्त्रशुद्ध अभ्यास
पुतळा किंवा एखादे शिल्प जितके लहान तितकेच त्या त्या व्यक्तिरेखांचा अभ्यास अगदी बारकाईने करावा लागतो. विविध छायाचित्रांचे संदर्भ त्यासाठी घ्यावे लागतात. महाराजांची जितकी दुर्मिळ छायाचित्रे मिळतील, ती उपलब्ध करून प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करूनच युवा शिल्पकारांनी हे पुतळे साकारले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com