छत्रपती शंभूराजे निघाले लढाईला...

अमित आवारी
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

नगर : छत्रपती शंभूराजे हातात समशेर घेऊन मैदान मारायला निघाले. त्यांच्या डोळ्यांतून अंगार टपकतोय. समोर गनिमाला पाहून त्यांनी हा रुद्रावतार धारण केला आहे.

नगर : छत्रपती शंभूराजे हातात समशेर घेऊन मैदान मारायला निघाले. त्यांच्या डोळ्यांतून अंगार टपकतोय. समोर गनिमाला पाहून त्यांनी हा रुद्रावतार धारण केला आहे. हा कुठल्या चित्रपटातील सीन नाही की नाटकातील प्रसंग नाही. हा आहे शंभूराजेंचा मेणाचा पुतळा. नगरमधील शिल्पकार अविनाश सोनवणे यांनी हा आविष्कार केला आहे. 

देश-विदेशात राजकीय नेते-सिनेअभिनेते-अभिनेत्री यांचे मेणाचे पुतळे आहेत. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे प्रेरणास्थान आहेत. त्यांचा पुतळाही शिर्डीत उभा राहतोय. तेथे शिव-साईसृष्टी आकाराला येत आहे. संभाजीराजांचा लढाईला निघालेल्या आवेशातील पुतळा साकारला आहे. 

सोनवणे वयाच्या 10व्या वर्षापासून मातीच्या शिल्पकृती तयार करत आहेत. गेल्या 22 वर्षांपासून ते या क्षेत्रात आहेत. त्यांचे वडीलही शिल्पकार आहेत.

गणेशोत्सवासाठी विविध मूर्ती साकारण्याचा त्यांना अनुभव आहे. सोनवणे यांना शिल्पकलेबाबत 2010-11मध्ये बॉम्बे सोसायटीचा पुरस्कारही मिळालेला आहे. त्यांना एकदा मेणाच्या पुतळ्यांविषयी माहिती मिळाली. देशातील सात ते आठ कलाकारांनाच ही कला येते. भारतात याचे शिक्षण मिळत नाही. एकलव्याप्रमाणे त्यांनी स्वतःच शिकायचा चंग बांधला.

पहिल्यांदा ते चुकले. ती चूक दुरुस्त करीत पुन्हा शिकले असे करता करता त्यांचा पुतळा तयार झाला. मेणाच्या पुतळ्यांसाठी अमेरिकन सिलिकॉन मेण आवश्‍यक असते. ते भारतात मिळत नाही. त्यामुळे त्यांनी थेट अमेरिकेतून हे मेण मागविले. सात ते आठ वर्षांच्या प्रयत्नात तब्बल 18 ते 20 प्रयोग फसल्यानंतर अखेर त्यांना संभाजीराजेंची भावमुद्रा साकारता आली. 

सोनवणे यांची साईबाबांवर श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांनी शिर्डीत साईबाबांच्या जीवनावर आधारित सिलिकॉन मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय उभारण्याचा संकल्प केला आहे. बाबांच्या जीवनावर चार ते पाच प्रसंग असतील. एका प्रसंगात किमान तीन ते चार मूर्ती असतील. या शिवाय छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज व संतांच्या मूर्तीही असतील. यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहे. 
यापूर्वी छत्रपती संभाजीराजांचा सिलिकॉन मेणाचा पुतळा कोणीही साकारला नसल्याचा दावा "सकाळ'शी बोलताना सोनवणे यांनी केला. 

हुबेहूब पुतळा 
छत्रपती संभाजी महाराज दोन्ही हातात तलवार घेऊन लढाईच्या आवेशात उभे आहेत. त्यांच्या डोळ्यांतून आक्रमकता ओसंडून वाहत आहे. या मूर्तीचा पोशाख वगळता सर्व वस्तू स्वतः सोनवणे यांनी तयार केल्या आहेत. बाजारातून मानवी केस आणून ते दाढीला चिकटवले आहेत. त्यामुळे जिवंतपणा आला आहे. पादत्राणे स्वतः सोनवणे यांनी बनवले आहेत. 

छत्रपती संभाजी महाराज यांची सिलिकॉन मूर्ती तयार करण्यासाठी अडीच लाख रुपये खर्च आला. शिर्डी येथील साईसृष्टी आगामी सहा ते आठ महिन्यांत तयार होईल, अशी अपेक्षा आहे. त्यादृष्टीने काम सुरू आहे. 
- अविनाश सोनवणे, शिल्पकार 

अविनाशने शिल्पकलेत 10 ते 15 वर्षांत अतिशय उच्च स्थान प्रस्थापित केले आहे. सिलिकॉन मेणापासून मूर्ती बनविणारे ते नगर जिल्ह्यातील पहिलेच कलाकार आहेत. 
- अनिल डेंगळे, कलाशिक्षक 

पुतळ्याचे वैशिष्ट्य 
* उंची साडेसहा फूट 
* मानवी त्वचेप्रमाणे आभास 
* 35 ते 40 किलो सिलिकॉन मेणाचा वापर 
* खर्च अडीच लाख रुपये 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhatrapati Shambhu Ready for battle