बेळगावातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यांना उत्तर कर्नाटकात मागणी 

मिलिंद देसाई
Saturday, 2 January 2021

शहरातील अनेक मूर्तीकार चांगल्या प्रकारे विविध प्रकारच्या मूर्ती बनवतात.

बेळगाव  : शहरातील मूर्तिकारांनी बनविलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना उत्तर कर्नाटकातून मागणी वाढली आहे. सध्या अनेक मूर्तिकारांकडून शिवपुतळे बनविण्याचे काम सुरु असून कार्यशाळेत सुबक व आकर्षक पुतळे दिसून येत आहेत. उत्तर कर्नाटकातील मंडळांकडून बेळगावातील मूर्तिकारांकडे शिवपुतळ्यासाठी मोठ्या प्रमाणात आगाऊ नोंदणीही करण्यात आली आहे. 

शहरातील अनेक मूर्तीकार चांगल्या प्रकारे विविध प्रकारच्या मूर्ती बनवतात. त्यामुळेच शहरातील मूर्तिकारांकडे विविध प्रकारचे पुतळे बनवून घेण्यासाठी नेहमीच मोठी मागणी असते. शहरातील ज्यादातर मूर्तीकार गणेशमूर्ती बनवितात. काही मोजकेच मूर्तीकार विविध महापुरुषांचे पुतळे साकारतात. सध्या सर्वाधिक मागणी शिवरायांच्या पुतळ्याला आहे. राणी कित्तूर चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा यांचे पुतळेही बनवून घेतले जात आहेत. शहरातील मूर्तिकारांनी बनविलेले पुतळे आकर्षक असल्याने बेळगावात पुतळा बनवून घेण्याकडे अनेकांचा ओढा असतो. सुरुवातीला बेळगाव, खानापूर आदी भागातून पुतळे बनवून घेण्यासाठी अधिक मागणी होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून राणेबेन्नूर, शिमोगा, विजापूर, धारवाड, हावेरी, गदग, कारवार, गोवा, चिक्‍कोडी, गोकाक व चंदगडच्या विविध भागातून पुतळा तयार करुन घेण्यासाठी मागणी वाढत आहे. 

पाच फुटापासून ते 20 फुटापर्यंतच्या अश्‍वारुढ शिवपुतळ्यांना अधिक मागणी आहे. सिंहासनारुढ छत्रपती शिवाजीराजे, बालशिवाजी यांच्या पुतळ्यांनाही मागणी आहे. पुतळा बनविण्यासाठी किमान सहा महिने आगाऊ नोंदणी केली जात आहे. तसेच ब्रॉंझऐवजी फायबरचा पुतळा तयार करुन घेण्यासाठी खर्च कमी येत असल्याने ज्यादातर पुतळे हे फायबरपासून बनविले जात आहेत. मूर्तिकारांकडे सध्या अनेक पुतळे तयार झाले आहेत. मात्र कोरोनाच्या संकटामुळे गतवर्षी ऑर्डर दिलेल्या अनेकांनी अजूनही पुतळा आपल्या गावात बसविलेला नाही. त्यामुळे तयार झालेले पुतळे ठेवण्यास मूर्तिकारांना जागा अपुरी पडत आहे. 

हे पण वाचा - ‘यंदा कर्तव्य आहे’सिद्धनेर्लीची निवडणूक पत्रिका व्हायरल 

 
""छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे तयार करुन घेण्यासाठी आगाऊ नोंद करण्यात आली आहे. यापैकी अनेक पुतळे तयार झाले आहेत. मात्र, कोरोनामुळे मिरवणूक व इतर कार्यक्रमांच्या आयोजनाला बंदी असल्याने पुतळे घेऊन जाण्यास विलंब झाला आहे. शिमोगा व इतर भागातून पुतळ्यांची अधिक मागणी आहे.''

 -विक्रम पाटील, मूर्तीकार, अनगोळ
  

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chhatrapati shivaji maharaj statue south karnataka belgaum