छत्रपती शिवाजी महाराज, रणरागिणी ताराराणी यांचा पारंपरिक उत्साहात रथोत्सव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

एक नजर

  • आकर्षक रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या, लवाजम्याचा थाट, नयनरम्य आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर... अशा पारंपरिक उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज व रणरागिणी ताराराणी यांचा रथोत्सव
  • ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘महाराणी ताराराणी की जय’ या जयघोषाने सारा रथोत्सव मार्ग दुमदुमून
  • छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टतर्फे सोहळ्याचे आयोजन

कोल्हापूर - आकर्षक रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या, लवाजम्याचा थाट, नयनरम्य आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर... अशा पारंपरिक उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज व रणरागिणी ताराराणी यांचा रथोत्सव झाला. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘महाराणी ताराराणी की जय’ या जयघोषाने सारा रथोत्सव मार्ग दुमदुमून गेला. छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टतर्फे या सोहळ्याचे आयोजन झाले. 

ऐतिहासिक भवानी मंडपातून रात्री साडेआठला श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते रथाचे पूजन झाले. त्यानंतर रथोत्सवाला प्रारंभ झाला. भवानी मंडप, महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलमार्गे बालगोपाल तालीम मंडळ येथे रथोत्सवाचे जोरदार स्वागत झाले.

मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, गुजरीमार्गे आझाद गल्ली चौक तसेच पुन्हा भवानी मंडप असा रथोत्सवाचा मार्ग राहिला. महालक्ष्मी प्रतिष्ठान ढोलपथक, सुरभी बॅंडपथकासह शिवशक्ती प्रतिष्ठानने भवानी मंडपात साकारलेली भव्य रांगोळी यंदाच्या सोहळ्याचे आकर्षण ठरली.

त्याशिवाय म्हसोबा देवालय ट्रस्टतर्फे गुजरी चौकात रथाचे 
विविधरंगी प्रकाशझोतांत स्वागत झाले. भवानी मंडप ते गुजरी या मार्गावर रथ आल्यानंतर प्रज्वलित झालेल्या मशालींनी रथोत्सवाची उंची आणखी वाढवली. दरम्यान, शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक, यशोवर्धन मंडलिक रथोत्सव सोहळ्याला उपस्थित होते. 

रथोत्सव मार्ग शिवमय
रथोत्सव मार्गावर ठिकठिकाणी रथाचे जोरदार स्वागत झाले. रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी होती. चौकाचौकांत भगव्या झेंड्यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा व पुतळ्यासमोर आकर्षक रांगोळ्या सजल्या होत्या.

Web Title: Chhatrapati Shivaji Maharaj, Tararani Rathoushav in traditional enthusiasm