मुख्यमंत्र्यांच्या कौतुकाने देसाई गट चार्ज

Devendra-Fadnavis
Devendra-Fadnavis

कऱ्हाड - लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या शताब्दी स्मारकाच्या उद्‌घाटन कार्यक्रमातून पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी पाटण तालुक्‍यातील दऱ्याखोऱ्यातील, वाडी-वस्तीवरील आबालवृध्दांची आपल्यामागे असलेली ताकद दाखवून मतदारसंघातील करिष्मा कायम असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांना दाखवून दिले.

कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी पाहून मुख्यमंत्र्यांनीही शंभूराज देसाई यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची घोषणा केली. खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून निवडणुकीच्या तोंडावर देसाई गट ‘चार्ज’ झाल्याचे दिसून आले.

पाटण विधानसभा मतदारसंघात आमदार देसाई व माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्यातील पारंपरिक लढत राज्यात प्रसिध्द आहे. मध्यंतरी पाटणकर गटाने माजी मंत्री पाटणकर यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा केला होता. त्या कार्यक्रमाला टक्कर म्हणून कालचा आमदार देसाई यांनी मुख्यमंत्री फडणवीस, अन्य मंत्री, खासदार, आमदार यांच्या उपस्थितीत घेतलेला कार्यक्रम मानला जात आहे. काल त्यांनी नेटके नियोजन करून जोरदार कार्यक्रम केला. त्याला पाटण तालुक्‍यातील वाडी-वस्तीवरील आणि दऱ्या-खोऱ्यातील जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.

शताब्दी स्मारकाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस, खासदार भोसले, मंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार देसाई यांच्या कामकाज पध्दतीचे विवेचन करून त्यांच्या कामाबद्दल त्यांचे कौतुक केले. सर्व क्षमता असतानाही काँग्रेसच्या सरकारने लोकनेते बाळासाहेब देसाई यांना मुख्यमंत्रिपदापासून वंचित ठेवले, असा आरोप करून आमदार देसाई यांनी शताब्दी स्मारकास आघाडी सरकारच्या काळात निधी मिळाला नसल्याचेही जाहीर सभेत सांगितले. तोच धागा पकडून मुख्यमंत्री फडणवीस यांनीही ज्या व्यक्तीने महाराष्ट्र घडवण्यामध्ये प्रमुख भूमिका निभावली, त्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे स्मारक करण्यासाठी इतका वेळ लागण्याची आवश्‍यकताच नव्हती, असे सांगून लोकनेत्यांना मुख्यमंत्रिपदापासून वंचित ठेवल्याचा आरोप केला.

तसेच शंभूराज देसाईंनी केलेल्या कामाचे कौतुन करून त्यांची पाठराखण केली. खासदार भोसले यांनी आपल्या खास ‘स्टाइल’मध्ये आमदार देसाईंनी केलेल्या कामाचे कौतुक करून ते करत असलेले काम जनतेसाठीच करत असून, तुम्हीही त्यांचे काम लक्षात ठेवा, अशी भावनिक सादही घातली. एकूणच आमदार देसाई यांनी शताब्दी स्मारक उद्‌घाटनाचा कार्यक्रम जोरदार करून आपला करिष्मा कायम असल्याचेच त्यातून दाखवून दिले. त्यातून देसाई गट ‘चार्ज’ झाल्याचे दिसत आहे.

शंभूराज भाजपच्या वाटेवर? 
पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंभूराज देसाई हे शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुका शिवसेनेतून लढवल्या आहेत. त्यांना खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दौलतनगर येथे जावून राज्य सहकार परिषदेचे अध्यक्षपद देवून लालदिव्याची गाडी दिली होती. त्यामुळे आमदार देसाई यांची सेनेवरील निष्ठा कायम आहे. मात्र, अलीकडे युती सरकारमधील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पाटण मतदारसंघात झालेले कार्यक्रम पाहून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांच्या मर्जीखातर आमदार देसाई हे भाजपमधून निवडणूक लढवतील की काय, याबाबत राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com