'दराचा प्रश्न सोडविण्याची मुख्यमंत्र्यांत हिंमत नाही'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 जानेवारी 2019

कोल्हापूर : "कोल्हापुरात येऊन साखरेच्या प्रश्‍नावर डरकाळ्या फोडणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात केंद्रात जाऊन हा प्रश्‍न सोडवण्याची हिंमत नाही. सध्याचे सरकार शेतकऱ्यांसाठी लबाड आणि बॅंका लुटणाऱ्यांना धार्जिण असल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली. तपोवन मैदानावर सुरू असलेल्या सतेज कृषी प्रदर्शनाची सांगता आणि सहभागी शेतकऱ्यांना पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे एकरकमी द्यावेत. सरकारला वठणीवर आणण्यासाठी स्वाभिमानीसह सर्वच शेतकरी कारखानदारांसोबत येतील; पण कारखान्यांनी आधी शेतकऱ्यांचै पैसे द्यावेत.

कोल्हापूर : "कोल्हापुरात येऊन साखरेच्या प्रश्‍नावर डरकाळ्या फोडणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात केंद्रात जाऊन हा प्रश्‍न सोडवण्याची हिंमत नाही. सध्याचे सरकार शेतकऱ्यांसाठी लबाड आणि बॅंका लुटणाऱ्यांना धार्जिण असल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली. तपोवन मैदानावर सुरू असलेल्या सतेज कृषी प्रदर्शनाची सांगता आणि सहभागी शेतकऱ्यांना पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे एकरकमी द्यावेत. सरकारला वठणीवर आणण्यासाठी स्वाभिमानीसह सर्वच शेतकरी कारखानदारांसोबत येतील; पण कारखान्यांनी आधी शेतकऱ्यांचै पैसे द्यावेत. सरकार सांगत असलेल्या 80-20 चा फॉर्म्युला चालू देणार नाही, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

शेट्टी म्हणाले, "सरकारने शेतकऱ्यांचे जगणे महाग केले आहे. रासायनिक खते, किटकनाशके, औषध, टॉनिक, प्लास्टिक, औषध पंप तसेच इतर साहित्यांवर जीएसटी लावला. यापूर्वी कृषी अवजारे किंवा उपयोगी साहित्यांवर जीएसटी किंवा कर लादला नाही. रासायनिक खतांवरील अनुदान दिलेले नाहीत, त्यामुळे खत कंपन्यांनी खतांच्या किमती वाढविल्या आहेत. सध्या उसाच्या एफआरपीचा मुद्दा आहे. साखरेच्या दराचा प्रश्‍न केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो. महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांना येथील शिष्टमंडळ घेऊन केंद्राकडे कारखान्यांचे दुखणे मांडावे लागते. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूलमंत्री पाटील यांच्यात केंद्रात जाऊन साखरेचा प्रश्‍न सोडविण्याची हिंमत नाही.'' 

ते म्हणाले, "यापूर्वी कॉंग्रेस सरकार असताना विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख आणि पृथ्वीराज चव्हाण यांनीही सारखेच्या प्रश्‍नावर केंद्रात धडक मारली होती. महाराष्ट्रातील परिस्थिती सांगण्यासाठी स्वत: हे मुख्यमंत्री स्वाभिमानी संघटेला घेऊन दिल्ली गेले होते. तिथे ही सर्व परिस्थिती सांगितली होती. या वेळी 5500 कोटींची मदत महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांसाठी दिली होती. भलेही ते कर्ज स्वरूपात दिले होते. सर्वाधिक कर हा साखर उद्योगातून दिला जातो. तरीही तत्कालीन गव्हर्नर रघुराम राजन यांना शेतकऱ्यांसाठी किती करायचे, असा सवाल केला होता. वास्तविक जे कर्ज काढून बॅंका लुटतात. कॉर्पोरेट कंपन्यांना लाखो कोटींचे कर्ज माफ केले होते. त्या वेळी हे महाशय काही बोलले नाहीत.'' माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांचेही भाषण झाले. 
या वेळी, महापौर सरिता मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, ऋतुराज पाटील, भगवान काटे उपस्थित होते. 

धोरण बदलायला भाग पाडले पाहिजे 
शेट्टी म्हणाले, "कृषी माल व साखरेला दर मिळण्यासाठी धोरण बदलले पाहिजे. यासाठी कारखानदारांसह सर्वपक्षीय लोकांनी एकत्र येऊन सरकारविरुद्ध लढा दिला पाहिजे. मग ते कोणत्याही पक्षाचे सरकार असो. आपण त्यांच्या विरोधातच लढले पाहिजे. सत्ताधाऱ्यांना आपण विरोधात वाटतो आणि विरोधकांना जवळचा. उद्या विरोधकांना विरोधाचा आणि सत्ताधाऱ्यांना आपला वाटू शकतो. 

मी भस्मासुर, महाराक्षस 
शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नाही. अशा वेळेला एखाद्या नेत्याच्या गाडीची काच फोडली तर तो राग नसतो. तर सरकारपर्यंत आपली भावना पोचवायची असते; पण काहींना आपण राक्षस वाटतो. मी राक्षस नाही तर भस्मासुर आणि महाराक्षस आहे, असे समजावे, असेही शेट्टी यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांना बळ 
सतेज कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देणारे प्रदर्शन आहे. भविष्यात अशा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिशा दाखवली पाहिजे, असे मत आमदार प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले. 

सात लाख शेतकऱ्यांची भेट 
कृषी प्रदर्शनाला सात लाख शेतकऱ्यांनी भेट दिली. हेच या कृषी प्रदर्शनाचे यश आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. 

पैसे देत नाहीत, ही शरमेची बाब 
या सरकारच्या काळात शेतकऱ्यांना वेळेत एफआरपीची रक्कम मिळू शकत नाही, ही शरमेची बाब आहे. तुम्ही-आम्ही आता बघ्याची भूमिका घेऊन गप्प बसून चालणार नाही. राजू शेट्टींनाही याचे गणित माहिती आहे. त्यामुळे आता कठीण परिस्थिती असल्याचे आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief minister cant handle problem of sugar price says Raju Shetty