Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्र्यांचा एक कॉल आणि महापौरांचे बंड थंडावले!

विजयकुमार सोनवणे
Saturday, 5 October 2019

दोन वर्षांपासून पालकमंत्री आणि महापौरांमध्ये सुरु असलेले शीतयुद्ध मुख्यमंत्र्यांच्या हस्तेक्षेपानंतर तूर्तास संपले आहे.

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांनी शुक्रवारी (ता.4) पहाटे महापौर शोभा बनशेट्टी यांना मोबाईलवरून कॉल केला. कोणतीही कारणे न सांगता पालकमंत्री विजय देशमुख यांच्याशी मिळते-जुळते घ्या. तुम्ही जाता की त्यांना पाठवू, अशी विचारणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी महापौरांना केली. त्यामुळे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून 'बंड' करण्याच्या तयारीत असलेल्या महापौरांचं बंड थंडावले. 

मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाल्यानंतर पालकमंत्री देशमुख यांनी महापौरांशी संपर्क साधला आणि तुम्ही येता की येऊ, अशी विचारणा केली. त्यावेळी आम्हीच तिकडे येतो, असे सांगत महापौर बाजार समितीच्या कार्यालयात गेल्या. त्याठिकाणी देशमुख आणि बनशेट्टी यांनी आपापल्या मनातील मळमळ बाहेर काढली, यापूर्वी झालेल्या एकेमकांच्या उकाळ्या-पाकळ्या काढल्या, काही कार्यकर्त्यांच्या साक्षीही काढल्या.

Image may contain: 3 people, people standing

पालकमंत्र्यांच्या विरोधात उघडपणे बंड करणे महापौरांनी योग्य केले नाही, असे देशमुख समर्थकांचे म्हणणे पडले. तर पालकमंत्र्यांनी आम्हांला कधी विश्‍वासातच घेतले नाही. विषबाधा प्रकरणात साधी विचारपूसही केली नाही, असे महापौर समर्थकांचे म्हणणे पडले. पालकमंत्री म्हणून आम्ही देशमुखांना नेहमीच मान दिला, पण महापौर म्हणून आम्हांला तसा मानसन्मान मिळाला नाही, अशी खंत बनशेट्टी यांनी व्यक्त केली. 

गेल्या काही वर्षांत झालेल्या समज-गैरसमजातून आता वाट काढून पक्षाचे उमेदवार विजयी होतील या दृष्टीने प्रयत्न करूयात, असे चर्चे अंती ठरले. त्याचवेळी महापौर म्हणून भविष्य काळात योग्य तो सन्मान दिला जाईल, सन्मान राखला जाईल, असेही ठरले. त्यानंतर महापौरांनी पालकमंत्री देशमुखांच्या प्रचारात सक्रीय सहभाग घेण्यास सुरवात केली. सायंकाळच्या वेळी शेळगी येथील बूथ कमिटीच्या बैठकीसाठी त्या आवर्जून उपस्थित राहिल्या.

एकंदरीतच गेल्या दोन वर्षांपासून पालकमंत्री आणि महापौरांमध्ये सुरु असलेले शीतयुद्ध मुख्यमंत्र्यांच्या हस्तेक्षेपानंतर तूर्तास संपले आहे. निवडणुकीनंतर हीच स्थिती कायम राहते, की पहिला पाढा पंचावन्नचा अनुभव येतो, हे येणारा काळच ठरवणार आहे. 

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Vidhan Sabha 2019 : सांगली जिल्ह्यात भाजपच्या चाैघांचा बंडाचा झेंडा

- 'यादीत नाव नाही, आता कसं वाटतंय?'; विद्यार्थ्यांनी काढले तावडेंना चिमटे!

- Vidhan Sabha 2019 : काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; प्रियांका गांधींचा समावेश!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Devendra Fadnavis call to the Mayor of Solapur for settlement for Maharashtra assembly election 2019