राजर्षीं शाहूंचा जलनितीचा मूलमंत्र देशभर पोहोचवणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

राधानगरी - शंभर वर्षापूर्वी सिंचनाच्या माध्यमातून राजर्षि शाहू महाराजांनी राधानगरीसह कोल्हापूर जिल्ह्यात हरीतक्रांती आणली. तीच दिशा घेऊन राज्यभर जलसिंचनाची निती अवलंबली. महाराजांचा हा मुलमंत्र देशभर पोहोचवू असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी केले. 

राधानगरी - शंभर वर्षापूर्वी सिंचनाच्या माध्यमातून राजर्षि शाहू महाराजांनी राधानगरीसह कोल्हापूर जिल्ह्यात हरीतक्रांती आणली. तीच दिशा घेऊन राज्यभर जलसिंचनाची निती अवलंबली. महाराजांचा हा मुलमंत्र देशभर पोहोचवू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी केले. 

येथे आज आलेल्या महाजनादेश यात्रेमध्ये ते बोलत होते. पाच मिनिटांच्या भाषणात त्यांनी पंधरा वर्षाच्या काँग्रेस - राष्ट्रवादीच्या कारभारावर कडाडून टिका केली आणि भाजपच्या पाठीशी राहण्याचे आवाहन त्यांनी केले. 

श्री. फडणविस म्हणाले, कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात ही जनयात्रा सुरू आहे. आजवर कोणत्याच सरकारचे मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळ केलेल्या कामाचे पोच घेण्यासाठी जनतेत गेले नाहीत. मात्र आम्ही केलेली कामांचा लेखाजोखा लोकांसमोर ठेवून आशिर्वाद घेत आहोत. ही महाराष्ट्राच्या इतिहासात पहिलीच वेळ असेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिवार्दाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षे राज्यात कारभार केला. दीन-दलीत, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर ,महिला, अल्पसंख्याक व अठरापगड जातीच्या आशा - आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पाच वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार कोटींची मदत केली. जी गेल्या पंधरा वर्षात काँग्रेस सरकारला जमली नाही. या राज्यात सिंचनाची कामे आम्ही केली. हा राधानगरी धरणाचा परिसर आहे. याचा इतिहास सर्वांना माहीती आहे. या महाराष्ट्रातील सिंचनाची सुरूवात इथून झाली आहे. आता तेच सिंचन या राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याकरिता प्रभावी कार्य या सरकारने केले आहे. यापूर्वी सिंचनाचे एवढे मोठे काम कधी झाले नव्हते. चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमांतून कोल्हापूर जिल्हयात विकासकामांचा डोंगर उभा केलेला आहे. जे आजवर घडले नाही ते त्यांनी करून दाखविले. येथेच नव्हे तर संबंध महाराष्ट्रात दर्जेदार रस्ते आणि बांधकामाच्या माध्यमातून त्यांनी सहा हजार किलोमीटर राज्यमार्गाचा प्रश्‍न निकालात काढला. गावा-गावात रस्ते दिले. इतकेच नव्हे तर या सरकारने महिला, शिक्षण, वीज, आरोग्य, यांचेही प्रश्‍न चुटकी सरशी सोडविले. आज शिक्षण आणि रोजगारामध्ये महाराष्ट्र देशात अव्वल आहे. तर सिंचनाच्या माध्यमातून शेतीतही अग्रेसर राहील. मिळालेल्या पाच वर्षात कामाचा डोंगर उभारला. मात्र अजूनही आम्ही समाधानी नाही. संपूर्ण कायापालट करण्यासाठी पुन्हा आम्हाला संधी द्या, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

या वेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपला पुन्हा सत्ता देवून विकासाला संधी द्या असे आवाहन केले. 

मंत्री चंद्रकांत पाटील, राहूल देसाई उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक शिरगावकर, जिल्हा उपाध्यक्ष व्ही. टी. जाधव, लहू जरग, संभाजी आरडे, डॉ. सुभाष जाधव आदींनी केले. दीपक शिरगावकर यांनी आभार मानले. विश्‍वास आरडे व प्रा.चंद्रशेखर कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

राजर्षी शाहूंची प्रतिमा भेट 
राधानगरीत मुख्यमंत्र्यांचे जल्लोषात स्वागत झाल्यानंतर परिसराचे भाग्यविधाते राजर्षी शाहू महाराज यांची प्रतिमा त्यांना भेट देण्यात आली. फडणवीस यांनी ती प्रतिमा अक्षरशः डोक्‍यावर घेवून मिरवली आणि अभिवादन केले. ही बाब सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात उचलून धरली. राधानगरी धरण पायथ्याला होणाऱ्या शाहू स्मारकाला विशेष बाब म्हणून मंजूरी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. स्मारक समितीचे अध्यक्ष अभिजीत तायशेटे व सरपंच कविता शेट्टी, दीपक शिरगावकर यांच्या हस्ते हा सत्कार झाला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister Devendra Fadnavis comment