मुख्यमंत्री म्हणाले, विरोधकांची अवस्था वर्गातल्या 'ढ' पोरांसारखी

मुख्यमंत्री म्हणाले, विरोधकांची अवस्था वर्गातल्या 'ढ' पोरांसारखी

पलूस - आमच्या यात्रांना मैदान पुरत नाही आणि विरोधकांच्या यात्रेत मंगल कार्यालय ही भरत नाही. यामुळे त्यांना आता वीस पंचवीस वर्षे विरोधक म्हणूनच काम करावं लागेल, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. विरोधकांना जनतेच्या मनात काय आहे हे समजत नाही. यामुळे त्यांची अवस्था वर्गातल्या 'ढ' पोरांसारखी झाली आहे, असेही ते म्हणाले.  

महाजनादेश यात्रेदरम्यान पलूस येथे आज दुपारी मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा झाली. यावेळी महसूलमंत्री व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार विलासराव जगताप उपस्थित होते.

महाजनादेश यात्रेवर विरोधकांकडून टीका होत आहे. याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले,  महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेच्या दर्शनासाठी महाजनादेश यात्रा काढली आहे. यात्रेची भाजपची परंपरा आहे. विरोधात असलो की संघर्ष यात्रा काढतो आणि सत्तेत असलो की संवाद यात्रा काढतो. जनतेशी संवाद साधायचा, त्यांचा आशिर्वाद घ्यायचा, नव्यानं जनादेश घ्यायचा. यासाठीच यात्रा असल्याचे विरोधकांच्या टिकेला चोख प्रत्युत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.

पलूसच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी याठिकाणी मोठे उद्योग आणणेसाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मुले उद्योजक बनतील आणि बेकारीचा प्रश्न सुटेल.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री म्हणाले, कर्जमाफी, दुष्काळी मदत, विमा अशी पाच वर्षात शेतकऱ्यांना 50 हजार कोटींची मदत केली आहे. तर 814 कोटीची मदत सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात टेंभू ताकारी म्हैशाळ योजनांना पैसा दिला. नऊ हजार कोटी देऊन पाणी योजना पुर्ण करण्याचा प्रयत्न आहे. येत्या काळात सांगली जिल्ह्यातील एकही पिण्याच्या पाण्याची योजना शिल्लक ठेवणार नाही. पलुसच्या पाणी योजनेकरता मागाल तो निधी उपलब्ध करून देऊ. पंतप्रधान आवास योजनेतून सात लाख घरांची निर्मिती करत आहे. 2021 पर्यंत एकही बेघर ठेवायचा नाही. प्रत्येक बेघराला घर देण्याचे उद्दीष्ट आहे. 

महापूरावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, जगात सर्वाधिक पाऊस सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरला पडला. पुरकाळात जागतिक बँकेची मदत घेऊन जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा सुव्यवस्था बंद पडू नये यासाठी अभ्यास सुरू आहे. महापुराचे पाणी कँनालच्या माध्यमातून दुष्काळी भागात नेण्याचा प्रयत्न आहे. यासाठी जागतिक बँकेकडे पाठपुरावा करणार आहे. पलुस कडेगावच्या औद्योगिक विकासासाठी मोठमोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. असे त्यांनी सांगितले.

चारही जिल्ह्यात भाजपचेच आमदार

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसेच शाहू महाराजांच्या वशांतील सर्व मंडळी भाजपमध्ये आली. कालच उदयनराजे भोसले भाजपमध्ये आले. मग राहिले काय. पश्चिम महाराष्ट्रातील चारही जिल्ह्यातील आमदार भाजपचे होतील. असा ठाम विश्वास त्यांनी बोलून दाखवला.

यावेळी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख, खासदार संजयकाका पाटील, अजित घोरपडे, राजाराम गरुड, सत्यजित देशमुख, सुरेंद्र चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी आभार मानले.

आवाज आला नाही
मुख्यमंत्री फडणवीस भाषणासाठी उभे राहिले व त्यांनी भारत माता की जय ची घोषणा दिली. मात्र, उपस्थितातून प्रतिसाद न आल्याने पलूस कडेगावचा आवाज इतका लहान आहे का? असा सवाल त्यांनी केला.

भाजप प्रवेश नाही
आजच्या सभेत पलूस कडेगावमधील इतर पक्षाचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा होती. मात्र आज एकही प्रवेश झाला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com