मुख्यमंत्र्यांसमोर शक्तीप्रदर्शनात पालकमंत्री यशस्वी

हरी तुगावकर
रविवार, 1 एप्रिल 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर शक्तीप्रदर्शन करून आपली ताकद दाखविण्यात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे यशस्वी झाले. रेल्वे बोगी कारखान्याचे भूमिपूजनाचा कार्यक्रम प्रचारी थाटाचा राहिला. हा कार्यक्रम आगामी निवडणुकीच्या प्रचाराची नादीच ठरला.
 

लातूर - रेल्वे बोगी कारखाना होणार की नाही यावर घेतल्या जाणाऱय़ा शंका,
याच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने पेटविण्यात आलेले रान, 51 कोटी रुपयांचे कर्जमाफीमुळे अडचणीत पडलेली भर या सर्वावर मात करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर शक्तीप्रदर्शन करून आपली ताकद दाखविण्यात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे यशस्वी झाले. रेल्वे बोगी कारखान्याचे भूमिपूजनाचा कार्यक्रम प्रचारी थाटाचा राहिला. हा कार्यक्रम आगामी निवडणुकीच्या प्रचाराची नादीच ठरला.

दोन महिन्यापूर्वी लातूर येथे रेल्वे बोगी कारखान्याचा झालेला प्राथमिक
निर्णय, त्यानंतर अवघ्या वीस दिवसात रेल्वे व राज्य शासनात झालेला करार त्यानंतर म्हणजे दोन महिन्याच्या आतच कारखान्याचे भूमिपूजन इतक्या वेगाने या घडामोडी घडल्या. त्यामुळे हे केवळ फार्स आहे, अशा वावड्या उठवल्या गेल्या.  त्यात शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अभय साळुंके यांची यात प्रमुख भूमिका राहिली. त्यांनी श्री. निलंगेकर यांच्यावर सातत्याने टीका करीत जाहिर आव्हानच दिले होते. 

एकीकडे हे सुरु असताना दुसरीकडे 51 कोटीच्या कर्जमाफीमुळे श्री. 
निलंगेकर यांच्या अडचणीत वाढ झाली होती. दररोज कोणत्या कोणत्या माध्यमातून त्यांच्यावर टीकेची राळ उठवली जात होती. या सर्व अडचणीवर मात करीत श्री. निलंगेकर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयमाने काम करीत होते. यात भूमिपूजनासाठी जिल्हा क्रीडा संकुल हे सभेचे ठिकाण निवडण्यात आले होते. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच सर्वात मोठी राजकीय सभा झाली. त्यानंतर कोणाचीच इतकी मोठी सभा झाली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या सभेला लोकांना गोळा करणे हे श्री. निलंगेकर यांच्यासमोर मोठे आव्हान होते. त्यामुळे श्री. निलंगेकर यांनी गेली पंधरा दिवस रात्रीचा दिवस केला. त्यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांनीही नियोजनाची बाजू संभाळली. पक्षातील पदाधिकाऱयांवर जबाबदारी टाकली गेली. नगरसेवकांनाही उद्दीष्ट देण्यात आले. याचा परिणाम क्रीडा संकुल लोकांनी खचाखच भरण्यात झाला. 
गेल्या काही निवडणुकासारखेच आजही निवडणूक नसताना लातूरकर माझ्या पाठीशी आहेत हे मुख्यमंत्र्यांना दाखवून देण्यात श्री. निलंगेकर हे यशस्वी झाले. ही गर्दी पाहून श्री. फडणवीस व श्री. गोयल यांनी आपल्या भाषणात श्री. निलंगेकर यांना कौतुकाची थापही दिली. इतकेच नव्हे तर कारखान्याच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी यांना येथे घेवून येण्याचे वचनही दिले.

हा भूमिपूजनाचा कार्यक्रम आगामी निवडणुकीच्या प्रचाराची नांदीच ठरणारा होता. तसाच तो प्रचारी थाटाचाच कार्यक्रम झाला. कार्यक्रम रेल्वेचा असला तरी स्टेजची सजावट पक्षाची होती. श्री. मोदी, श्री. फडणवीस, श्री. निलंगेकर यांच्या क्रीडा संकुलात तसेच शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले मोठे फ्लेग्ज जनू काही सध्या निवडणूकच चालू आहे हे भासवत होते. हा कार्यक्रम यशस्वी केल्याने मुख्यमंत्र्यांच्या दरबारात श्री. निलंगेकर यांचे वजन मात्र वाढले गेले आहे.

लातूरकरांची निराशा
रेल्वे बोगी कारखाना हा लातूरकरांसाठी मोठी उपलब्धी आहे. पण त्यासोबतच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडून काही अपेक्षाही होत्या. पालकमंत्री निलंगेकर व खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी आपल्या भाषणातून त्या बोलूनही दाखवल्या. पण श्री. गोयल यांनी त्याला बगल दिल्याने लातूरकरांची निराशा झाली.

Web Title: chief minister devendra fadnavis Guardian minister sambhaji patil nilangekar