मुख्यमंत्र्यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयाचे लोकार्पण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

सांगली - सांगली-मिरज रस्त्यावर विजयनगर येथे साकारलेल्या भव्य जिल्हाधिकारी कार्यालयाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. तब्बल 21 कोटी 90 लाख रुपयांचा खर्च करून साकारलेल्या या कार्यालयामुळे जिल्ह्याच्या वैभवात भर पडली आहे. सांगली-मिरज रस्त्यावरील विजयनगर येथे हे कार्यालय आहे. कॉंग्रेस आघाडी शासनाच्या कार्यकालात या कामाचा प्रारंभ झाला होता. गेली दोन वर्षे या इमारतीचे काम सुरू होते. भव्य अशा तीन मजली या इमारतीचे आज मुख्यमंत्र्याच्या धावत्या दौऱ्यात लोकार्पण झाले. 

सांगली - सांगली-मिरज रस्त्यावर विजयनगर येथे साकारलेल्या भव्य जिल्हाधिकारी कार्यालयाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. तब्बल 21 कोटी 90 लाख रुपयांचा खर्च करून साकारलेल्या या कार्यालयामुळे जिल्ह्याच्या वैभवात भर पडली आहे. सांगली-मिरज रस्त्यावरील विजयनगर येथे हे कार्यालय आहे. कॉंग्रेस आघाडी शासनाच्या कार्यकालात या कामाचा प्रारंभ झाला होता. गेली दोन वर्षे या इमारतीचे काम सुरू होते. भव्य अशा तीन मजली या इमारतीचे आज मुख्यमंत्र्याच्या धावत्या दौऱ्यात लोकार्पण झाले. 

सकाळी नियोजित वेळेआधी पंधरा मिनिटे म्हणजे दुपारी एक वाजता मुख्यमंत्री उद्‌घाटनस्थळी आले. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी स्वागत केले. यावेळी माजी मंत्री पतंगराव कदम, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, सदाभाऊ खोत, अनिल बाबर, विलासराव जगताप, महापौर हारूण शिकलगार, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणेचे मुख्यअभियंता पी. एम. किडे, उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ एस. डब्ल्यू. गेडाम, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, सार्वजनिक बांधकाम मंडळ कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे, मिरज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एस. जाधव आदि मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन भरवलेल्या "रंग महसुली' या प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले. यावेळी इमारतीचे कंत्राटदार मोहिते अँन्ड सन्सचे अमरसिंह मोहिते यांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला. 

यानिमित्ताने इतिहासाचे अभ्यासक मानसिंग कुमठेकर यांच्या संग्रहातील जुन्या महसुली दस्ताऐवजाचे हे प्रदर्शन उद्‌घाटन समारंभाचे आकर्षण ठरले. मुख्यमंत्र्यांनी दहा मिनिटे या प्रदर्शनस्थळी व्यतीत केली. त्यात त्यांनी 1773 च्या मोडी दस्ताऐवजाची माहिती श्री कुमठेकर यांच्याकडून घेतली. देशातील असे पहिलेच प्रदर्शन असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्य इमारतीत दर्शनी भागात कायमस्वरुपी हे प्रदर्शन भरवले जाणार असून त्यात महसुल विभागाला मार्गदर्शक ठरतील अशी जुनी कागदपत्रे मांडली जातील. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच सांगली ब्रॅंडींगच्या चित्रफीतीचे (सी. डी.) प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगली ब्रॅंडींग दिनदर्शिका भेट दिली. 

असे आहे जिल्हाधिकारी कार्यालय 
* तळमजला - स्टोअर रूम, रेकॉर्ड, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हॉल, आवक-जावक विभाग आणि कॅन्टिन. 
* पहिला मजला - जिल्हाधिकारी कक्ष, बैठक कक्ष, स्वीय सहायक कक्ष, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी विश्रांती कक्ष, अतिरिक्त उपजिल्हाधिकारी कक्ष, करमणूक विभाग, रोहयो विभाग आणि नियोजन विभाग. 
* दुसरा मजला - अप्पर जिल्हाधिकारी कक्ष, त्यांचे कोर्ट रूम, जिल्हा नियोजन बैठक हॉल, उपजिल्हाधिकाऱ्यांचे कक्ष. 
* पार्किंग - तळमजल्यावर कर्मचारी, अधिकारी. 
* पहिल्या मजल्यावर जिल्हाधिकाऱ्यांचा कक्षापर्यंत जाण्यासाठी दोन्ही बाजूंनी आकर्षक रस्ता असून थेट दुसऱ्या मजल्याच्या दारात वाहन जाऊ शकते. 

Web Title: Chief Minister inaugurated the collective office