ते आले... त्यांनी पाहिले आणि अच्छे दिन आले...

श्रीकांत कात्रे
रविवार, 21 मे 2017

एखादा सण आला, की घरात उत्साहाचे वातावरण असते. एखादा मोठा नेता येणार असेल त्या वेळी राजकीय गोटात सणाचे वातावरण आपोआप निर्माण होते. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा सातारा जिल्ह्याचा दौरा असाच सणासारखा झाला. शासकीय कार्यक्रमांबरोबरच काही गावांमधील कार्यक्रम गर्दीने व्यापलेले. हौशे, नवसे आणि गवसे साऱ्यांची हजेरी. फोटो काढण्याच्या धांदलीपासून मुख्यमंत्र्यांशी सलगी वाढविण्यासाठी झालेले प्रयत्न. मधूनच प्रश्‍नांची चर्चा. जागेवर आश्‍वासने. या वातावरणात सणाचा उत्साह द्विगुणित होत होता. ठिकठिकाणी होणारा ‘अच्छे दिनां’चा साक्षात्कार ऐन उन्हाळ्यात मनाला गारवा देत होता.  

एखादा सण आला, की घरात उत्साहाचे वातावरण असते. एखादा मोठा नेता येणार असेल त्या वेळी राजकीय गोटात सणाचे वातावरण आपोआप निर्माण होते. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा सातारा जिल्ह्याचा दौरा असाच सणासारखा झाला. शासकीय कार्यक्रमांबरोबरच काही गावांमधील कार्यक्रम गर्दीने व्यापलेले. हौशे, नवसे आणि गवसे साऱ्यांची हजेरी. फोटो काढण्याच्या धांदलीपासून मुख्यमंत्र्यांशी सलगी वाढविण्यासाठी झालेले प्रयत्न. मधूनच प्रश्‍नांची चर्चा. जागेवर आश्‍वासने. या वातावरणात सणाचा उत्साह द्विगुणित होत होता. ठिकठिकाणी होणारा ‘अच्छे दिनां’चा साक्षात्कार ऐन उन्हाळ्यात मनाला गारवा देत होता.  

भाजपच्या नेत्या-कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर तर आनंदाचे थरच होते. विरोधकांचा जिल्हा असला तरी ‘प्रोटोकॉल’ म्हणून का होईना; पण जिल्ह्यातील काही आमदार मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला वावरत होते. पालकमंत्री आणि सहपालकमंत्री कुरवल्याच्या थाटात सगळीकडे मुख्यमंत्र्यांना सोबत देत होते. प्रशासन तर मुख्यमंत्री येण्याचा वार्तेपासूनच सज्जतेच्या तयारीला लागले होते. मुख्यमंत्री जाण्यायेण्याच्या मार्गावरील स्वच्छतेपासून ते अगदी रातोरात झाडे उभी करण्यापर्यंत आवश्‍यक ‘शो’ अधिकारी वर्गाने केला नसता तर नवलच. अगदी नेहमी अतिक्रमणाने बकाल सजलेला विश्रामगृहाचा रस्ताही चकाचक होऊन गेला. दिवाळीच्या तयारीसाठी घराची रंगरंगोटी करावी, इतक्‍या मनापासून अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्याची तत्परता दाखविली.

एरवी सुस्त असणारे प्रशासन गतिमान झाले, हे जिल्ह्याचे अहंभाग्यच! धन्य ते मुख्यमंत्री आणि धन्यधन्य प्रशासन! सर्वसामान्य माणूस एका दिवसासाठी तरी खुश झाला. मुख्यमंत्र्यांनी वारंवार यावे, असे त्याला मनापासून वाटू लागले; पण ते इथे येत राहिले तर विदर्भाचे काय होणार, हा प्रश्‍नही होताच. असो. काही का असेना. फडणवीसांनी एका दिवसासाठी तरी प्रशासनात जान आणली, हे खरेच. मुळात मुख्यमंत्र्यांचे व्यक्तिमत्त्व प्रसन्न! त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे औपचारिक उद्‌घाटन, अधिकाऱ्यांची आढावा बैठक आणि गावोगावच्या भेटी साऱ्या ठिकाणी कसे प्रसन्न वातावरणच राहिले. ही सारी प्रसन्नता केवळ व्यक्तिमत्त्वापुरती राहिली नाही. अनेक बाबतींतील निर्णयांबाबतही मुख्यमंत्री प्रसन्न झाले. अनेक वर्षांपासूनचा रेंगाळलेला आणि जागेच्या फितीत अडकलेला मेडिकल कॉलेजचा प्रश्‍नही त्यांनी प्रसन्नचित्ताने मार्गी लावला. महिनाभरात कॉलेजचा प्रश्‍न सुटलेला असेल, असे आपणही प्रसन्नपणे मान्य करून टाकले. जलसंधारणाच्या कामांना भेटीगाठी घेताना तर मुख्यमंत्री लोकसहभाग पाहून जणू भारावूनच गेले. स्वच्छ भारत अभियान असेल किंवा पंतप्रधान आवास योजना जिल्ह्यातील सगळेच काम कसे सुंदर झाले आहे, याची प्रचिती केवळ मुख्यमंत्र्यांमुळेच झाली. स्वच्छता कुठे व कशी झाली, असा प्रश्‍न पडण्याचे आता कारण नाही. कारण या योजनांमध्ये आपला जिल्हा राज्यातच नव्हे तर देशात प्रथम येऊ शकतो, असा विश्‍वासच फडणवीसांनी व्यक्त केला. म्हणजे आपल्या जिल्ह्याला निधी देत नसल्याची ओरड जिल्ह्यातील आमदार करतात, ती ओरड खरी की मुख्यमंत्र्यांना भावलेली कामे खरी, काहीच न कळण्यासारखी परिस्थिती आहे. जलसंधारणाची कामे लोकसहभागातून गावोगावी सुरू आहेत. त्यापैकी काही गावांना मुख्यमंत्र्यांनी भेटी दिल्या. लोकांचे कौतुक केले. श्रमदानही केले. या लोकांना प्रोत्साहन देण्याचे काम फडणवीस यांनी केले, ही खरोखरच उमेद देणारी गोष्ट आहे. जलसंधारणाची कामे गावोगावचे लोक करताहेत. हे काम चांगलेच होणार आहे, यात शंका असायचे कारण नाही. तिथे गावकऱ्यांनी घाम गाळलेला आहे. जलसंधारणाच्या कामातून ‘चमकोगिरी’ करणारे काही जण सोशल मीडियापासून टीव्हीच्या पडद्यापर्यंत चमकणार आहेत आणि जलसंधारणाच्या कामाचे श्रेय घेणारही आहेत. तसे असले तरी मुख्यमंत्र्यांनी गावकऱ्यांच्या पाठीवर टाकलेली थाप मोलाची ठरणार आहे व पुढील काळातही ही थाप कायम गावकऱ्यांच्या पाठीवरच असावी, टिमकी वाजविणाऱ्यांच्या पाठीवर नको, याची खबरदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी. लोकांच्या श्रमाला किंमत आहे. गावासाठी राबणाऱ्या हजारो हातांचा सन्मान जरूर करावा आणि या लोकसहभागाच्या चळवळीला मुख्यमंत्र्यांनी ताकद द्यावी, ही दिशा तरी या गावांच्या भेटीने मिळावी, अशी अपेक्षा आहे. 
सध्या जिल्ह्यात दुष्काळाचे चटके सहन करणारी माणसे तहानलेली आहेत.

टॅंकरचा प्रस्ताव प्रशासनाकडे कधी जातो, कधी मंजूर होतो, गावात खरोखरच टॅंकर येतो का, ठरल्याप्रमाणे गरजेनुसार पाणीवाटप होते का, टॅंकरच्या खेपा कशा जातात, लोकांना टॅंकरचे पाणी तरी वेळेवर मिळते का, अशी चौकशी मुख्यमंत्र्यांनी केल्याचे काही समजले नाही. ‘जे जे दिसते ते ते अच्छे’ असेच आता म्हणायला हवे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात ‘अच्छे दिन’ आणायचे आहेत. फडणवीस तर मोदींचे निकटचे विश्‍वासू साथीदार. त्यांनाही दिसणार ते सारे ‘अच्छे’च असायला हवे. त्यामुळे सारे काही आलबेल आहे. आता महिनाभरात मेडिकल कॉलेज मार्गी लागेल. जिहे- कठापूर, उरमोडीचे पाणी माण- खटावमध्ये खळखळून वाहेल, साताऱ्यातील वस्तूसंग्रहालय पर्यटकांचे आवडते ठिकाण बनून जाईल... सारा देश ‘अच्छा’ बनत असताना सातारा जिल्हा तरी मागे का राहावा? आपण सर्वसामान्य माणसे उगाचाच ओरडत बसतो. जरा फडणवीसांच्या दृष्टीने पाहा... सारे काही ‘अच्छे’ झालेलेच तुम्हाला दिसू लागेल. तेव्हा आपली दृष्टी बदला...  

Web Title: chief minister satara tour