परिवहन कसं चालवायचं मी सांगतो... मुंबईला या...

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

अनास्था दाखविणाऱ्या आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी सुनावले

सोलापूर: परिवहन उपक्रमामुळे महापालिकेला नेहमीच नुकसान सोसावे लागते. परिवहनची जबाबदारी महापालिकेने घेणे शक्य नाही.. परिवहन चालवणे महापालिकेच्या आवाक्याबाहेरचं आहे.. अशा शब्दात नेहमीच अनास्था दाखविणाऱ्या आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी, परिवहन कसं चालवायचं मी सांगतो....मुंबईला या....बैठक लावा... अशा शब्दात सुनावलं.

अनास्था दाखविणाऱ्या आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी सुनावले

सोलापूर: परिवहन उपक्रमामुळे महापालिकेला नेहमीच नुकसान सोसावे लागते. परिवहनची जबाबदारी महापालिकेने घेणे शक्य नाही.. परिवहन चालवणे महापालिकेच्या आवाक्याबाहेरचं आहे.. अशा शब्दात नेहमीच अनास्था दाखविणाऱ्या आयुक्तांना मुख्यमंत्र्यांनी, परिवहन कसं चालवायचं मी सांगतो....मुंबईला या....बैठक लावा... अशा शब्दात सुनावलं.

सकाळच्या सत्रात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. संपाबाबत तोडगा काढावा, तसेच जनबसची खरेदीत झालेल्या गैरव्यवहाराची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली. बॅटऱ्या चोरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची भाषा करणारे आयुक्त, मोठ्या चोऱ्या करून गेलेल्यांना पाठीशी घालत आहेत. जनबसची संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी दोन वर्षांपासून सर्वच सदस्य करीत आहेत, मात्र त्याबाबत काहीच कार्यवाही आयुक्तांनी केली नाही, अशी माहिती श्री. मस्के यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. त्यावेळी, कारवाईचे काम माझे नाही, मात्र परिवहनचा प्रश्न कायमस्वरुपी कसा मार्गी लागेल याचे निश्चित नियोजन करतो, असे आश्वासन दिले. यावेळी शहर प्रमुख प्रताप चव्हाण, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, देवेंद्र कोठे उपस्थित होते.

परतीच्या मार्गावर निघाल्यावर विमानतळावरील कक्षात बंद दरवाज्याआड परिवहनबाबत मुख्यमंत्र्यांनी महापौरांशी चर्चा केली. यावेळी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजय देशमुख व आयुक्त अविनाश ढाकणे उपस्थित होते. परिवहनच्या संपाबाबत तातडीने तोडगा काढावा, संपामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे, पैसे न देण्याची भूमिका आयुक्तांनी घेतली आहे, अशी माहिती महापौर देत असतानाच, आयुक्तांनी त्यात हस्तक्षेप करीत, परिवहन उपक्रमामुळे महापालिकेला नेहमीच नुकसान सोसावे लागते. परिवहनची जबाबदारी महापालिकेने घेणे शक्य नाही.. परिवहन चालवणे महापालिकेच्या आवाक्याबाहेरचं आहे....असे नेहमीचे गार्हाणे सुरु केले. त्यांना थांबवत मुख्यमंत्री म्हणाले, परिवहन चालवणे ही महापालिकेचीच जबाबदारी आहे. ते कस चालवायचे ते मी सांगतो..मुंबईला या..बैठक लावा..अशा शब्दांत सुनावले.

बैठक घेण्याचे आदेश
महापालिका परिवहन उपक्रमाबाबत मुंबईत बैठक बोलावण्याचे आदेश पालकमंत्र्यांना दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी माजी आमदार नरसय्या आडम यांना दिली. माकपच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन संपाबाबत माहिती दिली. पदाधिकारी व प्रशासनाने जाणीवपूर्वक या संपाकडे दुर्लक्ष केल्या आरोपही त्यांनी केला. त्यावेळी, थकीत वेतन व इतर मागण्याबाबत लवकरच मुंबईत बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Web Title: The chief minister told the commissioner about transport