महापालिका गाळ्यांच्या लिलावाला मुख्यमंत्र्यांचा 'ब्रेक' 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 12 जुलै 2018

सोलापूर : महापालिकेच्या मेजर व मिनी गाळ्यांच्या ई लिलाव प्रक्रियेला तूर्त स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. महापालिकेचे पदाधिकारी व व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांना या संदर्भातील निवेदन नागपूरमध्ये दिले. दरम्यान, स्थगितीबाबतचे कोणतेही अधिकृत आदेश गुरुवारी सायंकाळपर्यंत मिळाले नसल्याचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले. 

सोलापूर : महापालिकेच्या मेजर व मिनी गाळ्यांच्या ई लिलाव प्रक्रियेला तूर्त स्थगिती देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. महापालिकेचे पदाधिकारी व व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्यांना या संदर्भातील निवेदन नागपूरमध्ये दिले. दरम्यान, स्थगितीबाबतचे कोणतेही अधिकृत आदेश गुरुवारी सायंकाळपर्यंत मिळाले नसल्याचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले. 

महापालिकेच्या मालकीच्या गाळे लिलाव पद्धतीने देण्याच्या शासनाच्या आदेशानुसार प्रशासनाकडून सुरू असलेल्या प्रक्रियेवर गाळेधारक, व्यापारी आणि प्रशासन व सत्ताधारी यांच्यामध्ये खडाजंगी सुरू होती. मात्र गाळ्यांच्या ई लिलाव पद्धतीला घेऊन पेटलेल्या या विषयाला अखेर मुख्यमंत्र्यांनी ब्रेक लावला आहे. शहरात महापालिकेच्या गाळ्यांच्या लिलाव प्रक्रियेला जोरदार विरोध दर्शवून गाळेधारक, व्यापारी संघर्ष समितीच्यावतीने मोर्चा, आंदोलन, धरणे करण्यात आले. या आंदोलनात शहरातील व्यापाऱ्यांनी आपल्या कुटुंबियांसह सहभाग नोंदविला होता. आंदोलन तीव्र करत असताना संघर्ष समितीच्यावतीने भाजपा वगळता सर्व विरोधी पक्षांच्या माध्यमातून 12 जुलै रोजी सोलापूर बंदची हाक देण्यात आली होती. 

फडणवीस यांची भेट घेऊन देण्यासाठी देशमुख यांनी मध्यस्थी केली. गाळे भाडेवाढ करताना मूळ व्यापारी विस्थापित होणार नाहीत, गाळे भाडेवाढीच्या धोरणात ई निविदा पद्धत येणार नाही, भाडेवाढ कशा पद्धतीने करायचे याचे धोरण ठरवू असे आश्वासन श्री. फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले. महापौर शोभा बनशेट्टी, संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक मुळीक, माजी आमदार नरसय्या आडम यांच्यासह भाजपचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते किसन जाधव, नगरसेवक नागेश वल्याळ, गणेश पुजारी, संतोष भोसले, नगरसेविका संगीता जाधव, केतन शहा, देवा गायकवाड, कुशल देढीया, अशोक आहुजा, विश्वजित मुळीक, श्रीशैल बनशेट्टी उपस्थित होते. 

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेली भूमिका मान्य करीत मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. आता लवकरच राज्यस्तरीय धोरण निश्‍चित केले जाणार आहे, त्यानुसार 
महापालिकेस कार्यवाही करावी लागेल. 

- शोभा बनशेट्टी, महापौर 

ई लिलाव झाल्यास व्यापाऱ्यांसमोर निर्माण होणाऱ्या अडचणींची माहिती दिली. व्यापारी भाडेवाढ देण्यास तयार आहेत असेही सांगितले. त्याची दखल घेत 
मुख्यमंत्र्यांनी ई लिलावला स्थगिती देत असल्याचे सांगितले.
 - अशोक मुळीक, अध्यक्ष गाळेधारक संघर्ष समिती 

ई लिलावाला दिलेली स्थगिती राजकीय आहे, ती फार दिवस राहणार नाही. या प्रक्रियेतून महापालिकेस अपेक्षित असलेले उत्पन्न शासनाने वेळच्या वेळी महापालिकेस उपलब्ध करावे, मग त्यांनी व्यापाऱ्यांना गाळे मोफत आणि कायम दिले तरी आमचा विरोध असणार नाही. 

- अशोक जानराव, अध्यक्ष सोलापूर महापालिका कामगार कृती समिती 

Web Title: Chief Minister's 'break' to the auction of municipal gates