टाकाऊ वस्तूंपासून बनवले हरभऱ्याची भाजी खुडणारे मशिन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

चिखलठाण - घरातील जुन्या टाकाऊ वस्तूंचा वापर करून जेऊर (ता. करमाळा) येथील प्रवीणकुमार बलदोटा या शेतकऱ्याने हरभऱ्याची भाजी खुडण्याचे यंत्र तयार केले आहे. या यंत्रापासून एका दिवसात चार ते पाच एकरांवरील हरभऱ्याचे शेंडे खुडले जात आहेत. हे यंत्र करण्यासाठी फक्त 400 रुपये खर्च आला आहे.

चिखलठाण - घरातील जुन्या टाकाऊ वस्तूंचा वापर करून जेऊर (ता. करमाळा) येथील प्रवीणकुमार बलदोटा या शेतकऱ्याने हरभऱ्याची भाजी खुडण्याचे यंत्र तयार केले आहे. या यंत्रापासून एका दिवसात चार ते पाच एकरांवरील हरभऱ्याचे शेंडे खुडले जात आहेत. हे यंत्र करण्यासाठी फक्त 400 रुपये खर्च आला आहे.

बलदोटा यांची जेऊर गावालगत शेतजमीन असून, त्यात सात एकर क्षेत्रावर हरभरा आहे. हरभरा फुलोऱ्यात येण्यापूर्वी शेंडे खुडल्यास नवीन जादा तगारे फुटून जादा घाटे लागतात व पीक जोमदार येते. त्यातून उत्पन्नात वाढ होते. शेंडे खुडण्याच्या कामासाठी ते मजूर शोधत होते.

दोनशे रुपये मजुरी देऊनही मजूर मिळत नाहीत. त्यामुळे हे काम मजुरांऐवजी यंत्राद्वारे करता येईल का, असा विचार बलदोटा यांच्या मनात आला. "सकाळ ऍग्रोवन'मध्ये एकदा अशा प्रकारच्या यंत्राविषयी वाचल्याचे त्यांचे सहकारी सुभाष इंगोले यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर दोघांनी विचार करून हे छोटेसे यंत्र तयार केले.

घरातील जुन्या सीडी प्लेअरची मोटर जोडून त्याच्यावर बुशिंग टाकून त्यात दोन ब्लेडची पाती बसवली. एका पीव्हीसी पाइपवर त्याची असेंब्ली करण्यात आली. संगणकाच्या जुन्या बॅटरीच्या साह्याने ती पाती फिरवून हरभऱ्याचे शेंडे खुडण्याचे यंत्र बनवले. त्याची चाचणीही यशस्वी झाली. आता 30 महिला मजुरांचे एका दिवसात होणारे काम हे छोटेसे यंत्र एका दिवसात करत आहे. बलदोटा यांच्या या यंत्रामुळे हरभरा खुडण्याचे काम सुखकर झाले आहेच. शिवाय मजुरीच्या खर्चातही मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे. त्यांच्या या यंत्राचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अनेक शेतकरी त्यांच्याकडे येऊन या यंत्राची माहिती घेत आहेत.

पुढील काळात या यंत्रात सुधारणा करून खुडलेली भाजी एकत्र गोळा करण्यासाठी यांत्रिक सुविधा करता येईल का, हा प्रयत्न करणार असल्याचे बलदोटा यांनी सांगितले.

Web Title: chikhalthan solapur news new machine making