चिकोडे ग्रंथालयातर्फे लवकरच स्पेस इनोव्हेशन लॅब

चिकोडे ग्रंथालयातर्फे लवकरच स्पेस इनोव्हेशन लॅब

कोल्हापूर - येथील जरगनगरातील (कै) भालचंद्र चिकोडे ग्रंथालयातर्फे स्पेस इनोव्हेशन लॅब उभारली जाणार आहे. विज्ञानाधिष्ठित समाजनिर्मितीसाठी अशा पद्धतीची राज्यातील ही पहिलीच लॅब ठरणार आहे. शनिवारी (ता. २३) पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ‘इस्त्रो’चे सीईओ गोविंद यादव, महाराष्ट्र वैज्ञानिक महामंडळाचे धनेश बोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार होणार असल्याची माहिती ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

श्री. चिकोडे म्हणाले, ‘‘मुलांच्या उपजत संशोधन वृत्तीला चालना देऊन जास्तीत जास्त वैज्ञानिक बनावेत. त्यांच्यातील गैरसमज दूर होऊन त्यांच्यात अंतराळ संशोधनाची आवड निर्माण करणे. अंतराळ आणि विज्ञान यातील गैरसमज दूर करून जास्तीत जास्त युवा संशोधक महाराष्ट्रातून तयार करणे, हा या लॅबचा उद्देश आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याचे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग असे विषय साध्या सोप्या कृतीतून शिकवले जाणार आहे.’’

देशभरात सात हजारहून अधिक ठिकाणी स्पेस इनोव्हेशन लॅब आणि सेंटर्स सुरू आहेत. मात्र, महाराष्ट्रात एकही लॅब नाही. ग्रंथालय परिसरातच लॅब उभारली जाणार आहे. केवळ कोल्हापूरच नव्हे तर महाराष्ट्रातील पाचवीपासून पुढे कोणत्याही विद्यार्थ्याला लॅबचा फायदा घेता येणार आहे. लॅबच्या माध्यमातून नेहरू सायन्स सेंटर, इस्त्रो, एसडीएनएक्‍स, सीआयजीएसडीआरडीओ, ब्रिक्‍स, स्पेस किडस्‌ आणि द रोज ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यशाळा होणार असून तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी धनेश बोरा, समन्वयक ऋचा लाटकर आदी उपस्थित होते.  

आठ संस्थांचा सहभाग
या लॅबच्या माध्यमातून जगभरातील आठ नामांकित वैज्ञानिक संस्थांचे नेटवर्क विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. केवळ कार्यशाळाच नव्हे तर विविध संस्थांच्या विविध अभ्यासक्रमांचा लाभ घेता येणार आहे. त्याशिवाय ‘इस्त्रो’सह या संस्थांना भेटीही दिल्या जाणार आहेत. त्यासाठी आवश्‍यक आर्थिक सहाय्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत.

बारा प्रोजेक्‍ट
लॅबमध्ये पहिल्या टप्प्यात रोबोटिक आर्म, ड्रोन, रॉकेट, सॅटेलाईट असे विविध बारा प्रोजेक्‍ट शिकवले जामार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला ते स्वतः बनवता येणार आहेत. त्यासाठी लागणारे साहित्य ग्रंथालयातर्फे पुरवले जाणार आहे. प्रत्येक शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवशी रोज चार तासांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पन्नास मुलांची एक बॅच असेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com