‘चिकोत्रा’च्या पाण्याचा शेतीसाठीच आग्रह

‘चिकोत्रा’च्या पाण्याचा शेतीसाठीच आग्रह

३६ गावांची पाण्यासाठी वणवण - एकाही ग्रामपंचायतीकडून पाटबंधारेकडे मागणी नाही 
सेनापती कापशी - चिकोत्रा प्रकल्पातील पाणी महिन्यातून एकदा सोडले जाते. ते अवघे आठच दिवस नदी पात्रात राहते. उरलेले तीन आठवडे पात्रच नव्हे, पिण्याच्या पाण्याची जॅकवेलही कोरडी पडतात. यामुळे ३६ गावे आणि वाड्यावस्त्यांवर पाण्यासाठी वणवण सुरु आहे. मात्र एकाही ग्रामपंचायतीने चिकोत्राच्या पाण्यासाठी आग्रह धरला नाही. येथे प्रत्येकजण शेतीच्याच पाण्याचा विचार करत आहे. 

चिकोत्रा नदीवर ३६ गावे व वाड्यावस्त्या अवलंबून आहेत. तसेच २८ बंधाऱ्यांवर १३ हजार एच.पी.चे विद्युत पंप शेतीसाठी उपसा करतात. यावर्षी केवळ ९२० दशलक्ष पाणीसाठा झुलपेवाडी (चिकोत्रा) प्रकल्पात होता. त्यापैकी आतापर्यंत सात वेळा शंभर दशलक्ष घनफूट प्रमाणे पाणी सोडण्यात आले. या काळात केवळ कागदारवर उपसाबंदीही लागू होती. 

सिंगल फेज पंपानी तर कहरच केला. त्यात काळम्मा बेलेवाडी व वडगाव या दोन गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेती पुनर्वसनासाठी देवूनही त्यांनाही पाणी अपूरेच मिळाले. येथील बंधारेही कमी क्षमतेचे असल्याचा त्यांना फटका बसला. 

याउलट यावर्षीच्या तीव्र उन्हाळ्याने माद्याळ, तमनाकवाडा, कापशीपासून बेळुंकीर्यंतच्या गावांना पिण्यासाठीच्या पाण्याची मोठी टंचाई जाणवत आहे. अनेक ठिकाणी मुश्रीफ फौंडेशन, व्यक्तीगत किंवा लोकवर्गणीतून बोअरवेल काढून पाणी उपलब्ध केले. मात्र खोल गेलेल्या भूजल पातळीमुळे कूपनलिका व विहीरी कोरड्या पडल्या. तरीही चिकोत्राचे पाणी सर्वच गावासाठी पिण्यासाठी राखीव ठेवावे, अशी कोणत्याही ग्रामपंचायतीने मागणी केली नाही हे विशेष !. 

चिकोत्राच्या पाण्याबाबत यावर्षी पाटबंधारे, शेतकरी आणि वीज वितरण कंपनी यामध्ये कोठेही समन्वय आढळून आला नाही. यामुळे काही शेतकऱ्यांनी पाण्यावर डल्ला मारला तर काहींना ते मिळालेच नाही. पिके वाचविण्यासाठी शेतकरी रात्रंदिवस नदीवर बसूनच आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी मात्र महिलावर्गाची वणवण सुरुच आहे.

चिकोत्रावर ३६ गावांचे जीवन 
या प्रकल्पामुळे शेती व पिण्यासाठी आजरा व कागल तालुक्‍यातील आरळगुंडी, बेगवडे, चिमणे, झुलपेवाडी, उत्तूर, चव्हाणवाडी, होन्याळी, कर्पेवाडी, महागोंड, दुंडेवाडी, बेलेवाडी हुबळगी, पिंपळगाव, धामणे, बामणे, पांगीरे, हसूर खुर्द, हसूर बुद्रूक, काळम्मा बेलेवाडी, ठालेवाडी, वडगाव, माद्याळ, कासारी, तमनाकवाडा, कापशी, बेलेवाडी मासा, आलाबाद, नंद्याळ, मुगळी, अर्जुनवाडा, जैन्याळ, करड्याळ, मेतके, हमिदवाडा, गलगले, खडकेवाडा, लिंगनूर-कापशी. ही गावे अवलंबून आहेत. म्हणून चिकोत्रासह रखडलेल्या नागणवाडी प्रकल्पाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. पाण्याचा ठणठणाट असूनही या गावांपैकी कोणत्याही ग्रामपंचायतीने पाटबंधारेकडे चिकोत्राचे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवावे असे पत्रही दिले नसल्याचे शाखा अभियंता उत्तम कापसे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com