सदुसष्ट अनाथांना मिळाले आई-वडील

Rohini-Dhawale
Rohini-Dhawale

सातारा - अनाथ बालकांना आई-वडिलांच्या मायेचे छत्र मिळवून देण्याचे लाखमोलाचे कार्य जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या नियंत्रणाखाली असलेले शिशुगृह करत असून, गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील ६७ अनाथ बालके अपत्यप्रेमासाठी व्याकुळ झालेल्या दांपत्यांना दत्तक दिली आहेत. 

दरम्यान, समाजात मुली दत्तक घेण्याचे प्रमाण जास्त असून, दत्तक दिलेल्या ६७ अर्भकांमध्ये ३६ मुली असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी दिली. दत्तक प्रक्रिया कायदेशीर बाबी काटेकोरपणे पाळून केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. 

जिल्ह्यात जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या नियंत्रणाखाली म्हसवड (ता. माण) येथे द्रोणागिरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिशुगृह चालविले जाते. गेली १३ वर्षे हे शिशुगृह उत्कृष्टपणे सुरू आहे. समाजात अनेकवेळा बेवारस स्थितीत कोठेही टाकून दिलेली अर्भके आढळतात. अशी बालके बहुतेकजण शिशुगृहात देतात. तसेच काहीजण सांभाळण्यास अकार्यक्षम असल्यानेही किंवा इतर कारणांनी अर्भके शिशुगृहात देतात. ही अर्भके म्हसवड येथील शिशुगृहात सांभाळली जातात. अनेकजण आपली अर्भके पुन्हा घेऊनही जातात. मात्र, अनेक अर्भकांना शिशुगृहात पूर्ण काळजी घेऊन सांभाळावे लागते. शिशुगृहात अर्भक देणाऱ्या किंवा जमा करणाऱ्या व्यक्तीने सूचना देऊनही ६० दिवसांत अर्भक न नेल्यास बालकल्याण समितीच्या वतीने संबंधित बाळाची दत्तक प्रक्रिया सुरू करण्याची परवानगी शिशुगृहास दिली जाते, अशी माहिती ढवळे यांनी दिली. दत्तक प्रक्रिया ही पूर्ण ‘ऑनलाइन’ केली आहे. ‘ऑनलाइन’ प्रक्रियेमुळे दत्तक प्रक्रियेचा कालावधी कमी झाला आहे. जे पालक दत्तक प्रक्रियेतून बाळ घेऊ इच्छितात, त्यांनी ‘ऑनलाइन पोर्टल’वर अर्ज करावयाचा असतो. बाळाचे लिंग, वयोगट याबाबतच्या अपेक्षा कोणत्या त्या नमूद कराव्या लागतात. पालकांचा ‘होम स्टडी’ करून त्यांना ‘आनलाइन पोर्टल’वर प्रतीक्षा क्रमांक दिला जातो.

पालकांना तीन बाळाचे तपशील दिले जातात. त्यामधील एका बाळाची पसंती त्यानंतर ४८ तासांत कळवणे इच्छुक पालकांना बंधनकारक असते. संबंधित पालक संस्थेमध्ये आल्यावर डिस्ट्रिक्‍ट चाइल्ड प्रोटेक्‍शनचे अधिकारी, संस्थेचे डॉक्‍टर पालकांची सर्व कागदपत्रे व माहितीची पडताळणी करतात. त्यानंतर बाळाची व पालकांची भेट घालून दिली जाते. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया झाल्यावर बाळ पालकांना दत्तक दिले जाते.

अनेक दांपत्यांना विविध कारणांनी मुले होऊ शकत नाहीत. अशी दांपत्ये चांगले बालक दत्तक घेण्याच्या विचारात असतात. बहुतेकांना शिशुगृहातून मूल दत्तक घेण्याशिवाय पर्याय राहात नाही. म्हसवड येथील शिशुगृहातून दत्तक प्रक्रियेच्या माध्यमातून गेल्या १३ वर्षांत १४५ बालकांचे कायदेशीर पुनर्वसन करून अनाथ बाळांना पालकांचे छत्र तर अपत्यांच्या प्रेमासाठी भुकेलेल्या दांपत्यांना अपत्य मिळवून दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com