बालमृत्यूंच्या प्रमाणात घट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

सातारा - कुपोषणमुक्त जिल्ह्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने राबविलेल्या विविध उपक्रमांमध्ये गेल्या तीन वर्षांत बालमृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे सुदृढ व सशक्त पिढी निर्माण होण्यास मदत होत आहे.

सातारा - कुपोषणमुक्त जिल्ह्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने राबविलेल्या विविध उपक्रमांमध्ये गेल्या तीन वर्षांत बालमृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे सुदृढ व सशक्त पिढी निर्माण होण्यास मदत होत आहे.

सामाजिक रचनेमध्ये महिलांचा आहार व आरोग्याबाबत फारशी दक्षता घेतली जात नव्हती. महिलाही कुटुंबातील व्यक्तींची काळजी घेतात. मात्र, स्वतःच्या आरोग्याची हेळसांड करतात. विशेषतः आहाराबाबत काळजी घेत नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये कुपोषणाची वाढ झाली होती. महिलांची प्रकृती व्यवस्थित नसली, तर त्याचा परिणाम साहजिकच मुलांवर होतो. अनेक वेळा बाल मृत्यू होतात, तसेच कमी वजनाची मुले जन्माला येतात. त्यामुळे मुलांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झालेली होती.  महिलांचे आरोग्य चांगले राहिले, तरच मुलेही सुदृढ होतील, या विचाराने आरोग्य विभागाने महिला व बालकांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. त्यात किशोरवयीन मुलींपासून महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यात येत आहे. हिमोग्लोबीन तपासणी मोहीम राबविल्या जात आहेत. त्यातून कमी हिमोग्लोबीन असलेल्या महिला व मुलींच्या आरोग्याकडे आरोग्यसेविकांच्या माध्यमातून लक्ष दिले जात आहे. या महिलांना अंगणवाडी कर्मचाऱ्यांमार्फत पोषक आहार पुरविला जातो, तसेच किशोरवयीन मुलींना हिमोग्लोबिन वाढावे, यासाठी लोहयुक्त गोळ्या पुरविल्या गेल्या आहेत. 

महिलांची प्रसूती सुरक्षित व्हावी, होण्यासाठी उपाययोजना राबविल्या गेल्या. शासकीय दवाखान्यातच प्रसूती करावी, यासाठी महिलांचे प्रबोधन केले जाते आहे. गर्भवती महिलेला दवाखान्यात जाण्यासाठी व प्रसूतीनंतर घरी येण्यासाठी वाहनाची मोफत व्यवस्था केली जाते. दवाखान्यात प्रसूती कालावधीत तीन दिवस मोफत भोजनही दिली जाते. जननी सुरक्षा योजनेच्या माध्यमातून सर्व लाभ दिले जातात. त्याचबरोबर तीस दिवसापर्यंतच्या बाळाला मोफत औषधोपचार दिले जात आहेत. प्रसूती पश्‍चातही महिला व बालकांच्या प्रकृतीकडे लक्ष दिले जात आहे. पालिका क्षेत्रातील गरोदर महिला, स्तनदा आणि किशोरवयीन मुलीच्या आरोग्यासाठी जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. कुपोषित बालकांचा सर्व्हे करून त्यांनाही सकस आहाराबाबत मार्गदर्शन केले जात आहे. 

जिल्हा रुग्णालयामध्ये अत्याधुनिक नवजात शुशूंचा अतिदक्षात विभाग करण्यात आला आहे. या विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळेही बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यात यश आले आहे. आहाराबाबत योग्य मार्गदर्शन, उपचाराच्या सुविधा, वैयक्तीक लक्ष या आरोग्य विभागाच्या या एकत्रित प्रयत्नांमुळे गेल्या तीन वर्षांत बालमृत्यूच्या प्रमाणात घट होत आहे.

Web Title: child death percentage