एकात्मिक बालविकास कार्यालयात प्रभारींची दमछाक; बालविकास अधिकाऱ्याचे पद रिक्त

हुकूम मुलाणी
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

तालुक्यातील मुलीचा जन्मदर कमी असून तो वाढावा म्हणून शासनाने सुरु केलेल्या माझी कन्या भाग्यश्री योजना तर या कार्यालयाने चांगलाच बोजवारा उडवून दिला दिलेले प्रस्ताव मंजूर की नामंजूर हे देखील लाभार्थ्याला कळविले नाही शिवाय त्रुटी असलेले प्रस्ताव कार्यालयातच ठेवून लाभार्थ्यांनी चौकशी केल्यावर मग नवीन नियमानुसार प्रस्ताव दयावा या नियमात तुम्ही बसत नसल्याचा सल्ला देण्यात आला.

मंगळवेढा - एकात्मिक बालविकास कार्यालयातील बालविकास अधिकाऱ्याचे पद रिक्त होवून वर्षाचा कालावधी होत आला तरी प्रभारीवर या कार्यालयाचा कारभार सुरुच असून प्रभारीवर त्याचा कारभार करताना दमछाक होत आहे. रिक्त पदामुळे या कार्यालयीन कामाबरोबर या खात्याच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या महिला व बालकांच्या योजनेचा मात्र खेळखंडोबा होत चालला आहे.

एकात्मिक बालविकास कार्यालयाच्या आखत्यारित तालुक्यात 264 बालवाडया असून त्यामध्ये 212 मोठया तर 52 मिनी अंगणवाडया आहेत तालुक्यातील बालकाच्या सर्व्हेनुसार 8904 इतक्या बालकांची नोंदी असून पट 7484 इतका असून प्रत्यक्षात उपस्थिती 5508 इतक्या बालकांची आहे. सध्या तालुक्यातील 160 अंगणवाडयाला इमारत असून 52 अंगणवाडयाला अजून इमारत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांना या मुलांना पाऊस, ऊन वारा यांचा सामना करत शिकवावे लागत आहे.

याशिवाय वाडीवस्तीवरील बालकांना घराजवळ शाळा व्हावी म्हणून तालुक्यातील वाडीवस्तीवर सुरु केलेल्या 52 पैकी 51 अंगणवाडयात निवाय्राचा अभाव आहे. यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली होताना दिसत नाही. चिमुकल्याच्या आयुष्याशी या कार्यालयाचा खेळ सुरु आहेत. एका बाजुला माध्यमिक शाळेत विद्यार्थी टिकावा म्हणुन घरातून शाळेला वाहनातून आणले जाते. पण या अल्पवयीन बालकांशीच्या पुढील शैक्षणिक भवितव्याबाबत या कार्यालयाच्या माध्यमातून खेळ खेळला जात आहे.

गरोदर माताना गरोदर काळात योग्य सकस आहार देखील या अंगणवाडयातून दिला जातो पण इमारत नसलेल्या ठिकाणी आहार उघडयावर ठेवावा लागतो. तर बालकांचा पोषण आहार देखील उघडयावर ठेवून उघडयावर शिजवून दयावा लागतो. त्यामुळे हा आहार खराब होण्याची शक्यता आहे. याशिवाय तालुक्यातील मुलीचा जन्मदर कमी असून तो वाढावा म्हणून शासनाने सुरु केलेल्या माझी कन्या भाग्यश्री योजना तर या कार्यालयाने चांगलाच बोजवारा उडवून दिला दिलेले प्रस्ताव मंजूर की नामंजूर हे देखील लाभार्थ्याला कळविले नाही. शिवाय त्रुटी असलेले प्रस्ताव कार्यालयातच ठेवून लाभार्थ्यांनी चौकशी केल्यावर मग नवीन नियमानुसार प्रस्ताव दयावा या नियमात तुम्ही बसत नसल्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे या कार्यालयाच्या निष्काळजी पणा मुलीचा जन्मदर वाढणार कसा? सवाल देखील विचारला जावू लागला. एका मुलीचा जन्म झालेल्याचे प्रस्ताव देखील या कार्यालयात धुळ खात पडून आहेत.

जबाबदार अधिकारीच या कार्यालयाला नसल्यामुळे या कार्यालयात काय चालले त्यांनाच माहित सध्या अंगणवाडी सेविकांना तालुकास्तरावरील ऑनलाइनची कामे लावली जात असून अल्पशिक्षीत अंगणवाडी सेविकांना कमी पगार असताना वरिष्ठांच्या दबावामुळे पदरमोड इतरांकडून हे काम करून घ्यावे लागत आहे.

बालविकास अधिकारी पद नियुक्ती मंत्रालयातून होत असल्याने रिक्त पदाबाबत शासनास कळविले आहे. - डी.एम.गिरी, बालविकास अधिकारी जिल्हा परिषद

पद रिक्त ठेवून बालविकास विभागाने तालुक्यातील बालकाच्या शिक्षणाची, निवारा व अन्य सोयीबाबत गैरसोय केली असून याबाबत बालविकास मंत्री कडे निवेदन देवून यासंदर्भात आवाज उठवणार आहे. - आ. भारत भालके

Web Title: Child Development Officers vacancies are empty at Integrated Child Development Office