बस अंगावरून गेल्याने बालकाचा चिरडून मृत्यू

राजकुमार शहा
रविवार, 16 डिसेंबर 2018

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका पाच वर्षीय चिमुरड्याच्या अंगावरुन भरधाव एसटी गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (रविवार) दुपारी दीडच्या सुमारास मोहोळ बार्शी रस्त्यावरील यल्लमवाडी शिवारात झाली.

मोहोळ : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका पाच वर्षीय चिमुरड्याच्या अंगावरुन भरधाव एसटी गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (रविवार) दुपारी दीडच्या सुमारास मोहोळ बार्शी रस्त्यावरील यल्लमवाडी शिवारात झाली. प्रज्वल संजीवकुमार जमादार (रा . मलिकपेठ) असे मृताचे नाव आहे. प्रज्वल हा आई वडिलाला एकुलता एक होता.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रज्वल व त्याचे कुटुंबीय मानेगाव येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते. विवाह आटोपून परतत असताना तो गावाकडे येण्यासाठी रस्त्याच्या कडेला थांबला होता. तेवढ्यात मोहोळ ते बार्शी जाणारी एसटी (क्र. एम एच 20 बी एल 0024) भरधाव आली आणि थेट प्रज्वलच्या अंगावर गेली. त्यामुळे त्याच्या डोक्यावरुन चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली होती. या घटनेची फिर्याद संजीवकुमार सायबण्णा जमादार (मूळ गाव गाणगापूर हल्ली रा. मलीकपेठ) यांनी मोहोळ पोलिसांत दिली असून, पुढील तपास हवालदार नागप्पा निंबाळे करीत आहेत.

Web Title: The child dies after ST Bus Accident