अद्यापही होतोय बालविवाहांचा थाट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

सातारा - जिल्ह्यात चोरी छुपके बालविवाहांना ऊत आला असून आज येथील बोहरी मस्जिदीनजीकच्या श्रीमंत प्रतापसिंह ऊर्फ दादामहाराज सांस्कृतिक हॉलमध्ये होणारा विवाह रोखण्यात महिला व बालविकास अधिकारी आणि पोलिसांना यश आले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने गेल्या सहा महिन्यांत रोखलेला हा पाचवा बालविवाह आहे. 

सातारा - जिल्ह्यात चोरी छुपके बालविवाहांना ऊत आला असून आज येथील बोहरी मस्जिदीनजीकच्या श्रीमंत प्रतापसिंह ऊर्फ दादामहाराज सांस्कृतिक हॉलमध्ये होणारा विवाह रोखण्यात महिला व बालविकास अधिकारी आणि पोलिसांना यश आले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने गेल्या सहा महिन्यांत रोखलेला हा पाचवा बालविवाह आहे. 

शासनाने कायदा केला असला तरी आजही समाजात बालविवाह होत आहेत. जावळी येथेही नुकताच विवाह रोखण्यात प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना यश आले होते. तर थेट जिल्ह्याच्या ठिकाणी साताऱ्यातही कोणाचा मुलाहिजा न बाळगता बालविवाह लावण्याचा प्रयत्न होत होता. आज साताऱ्यात विवाह होणार असून संबंधित वधूचे वय फक्त १६ असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयास मिळाली. वडगाव निंबाळकर (जि. पुणे) येथील वर आणि लोणंद येथील वधूचा हा विवाह होणार होता. यामधील मुलाचे वय २० तर मुलीचे वय फक्त १६ असल्याचे अधिकाऱ्यांना समजले होते. साताऱ्यातील एका कार्यालयात विवाह होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली. माहिती मिळताच ते वेळेत विवाह कार्यालयात पोचले. या विवाहाची माहिती त्यांनी शहर पोलिसांनाही दिली.

शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, गोपनीय शाखेचे सचिन नवघणे, इतर अधिकारी कार्यालयात दाखल होताच संबंधित वऱ्हाडी, मुला-मुलीचे नातेवाईक आणि कुटुंबीयांत अस्वस्थता पसरली. मुला-मुलींच्या कुटुंबीयांना त्यांनी वधू-वरांच्या दाखल्याबाबत विचारले. मुलीचे वय कमी असल्याचे समजल्याने हा विवाह करता येणार नाही, असे अधिकाऱ्यांना सांगितले. त्यावेळी नातेवाईक, वधू-वरांच्या कुटुंबीयांनी हा विवाह सोहळा नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी त्यांना ठणकावून सांगून होणारा बालविवाह रोखला. त्यांना त्याबाबत समज देण्यात आली तसेच उद्या (बुधवार) सकाळी अकरा वाजता महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात वधू-वराच्या वयाचे पुरावे सादर करण्याची सूचना देण्यात आली. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत रोखलेला हा पाचवा बालविवाह असल्याची माहिती श्रीमती ढवळे यांनी दिली. त्यावेळी सहायक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी विद्या आगवणे, बालकल्याण समितीचे ॲड. योगेंद्र सातपुते उपस्थित होते.

लोणंदलाही प्रयत्न
आज कारवाई झालेल्या वर-वधू कुटुंबीयाने यापूर्वीही हाच विवाह लोणंदमध्ये करण्याचा घाट घातला होता. परंतु, तेथेही काही समाजसेवी व्यक्‍तींनी विरोध दर्शवल्यावर तो फसला. परिणामी हा विवाह आज साताऱ्यात केला जात होता, असे विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: Child Marriage Crime