शिर्डी (जि. नगर) - साईबाबा मंदिरालगत असलेल्या गुरुस्थानाजवळ आज अज्ञात मातेने सहा महिन्यांच्या मुलीला बेवारस सोडून दिले. साई संस्थानाच्या महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या बाळाला ताब्यात घेतले. मुलीला सोडून गेलेली महिला "सीसीटीव्ही' कॅमेऱ्यात कैद झाली असून, शिर्डी पोलिस तिचा शोध घेत आहेत.
गुरुस्थान येथे दर्शन घेण्यासाठी आज पहाटे सहाच्या सुमारास भाविकांनी गर्दी केली होती. त्याचा फायदा घेऊन केशरी रंगाची साडी परिधान केलेल्या महिलेने सहा महिन्यांच्या मुलीला तेथे ठेवून दिल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. रडत असलेली चिमुरडी पाहून भाविकांनी सुरक्षा विभागास कळविले. महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तिला ताब्यात घेतले व संस्थानाच्या रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती ठणठणीत आहे.
पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या मुलीला नगरच्या महिला बालकल्याण समितीकडे सोपविणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
|