चिल्लर पार्टी बालचित्रपट महोत्सव रंगणार बुधवारपासून 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीच्या वतीने बुधवार (ता. 15) पासून दुसऱ्या बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. सलग दोन दिवस शाहू स्मारक भवनात रंगणाऱ्या या महोत्सवात जागतिक चित्रपट मोफत दाखवले जाणार आहेत. 

कोल्हापूर - येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीच्या वतीने बुधवार (ता. 15) पासून दुसऱ्या बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. सलग दोन दिवस शाहू स्मारक भवनात रंगणाऱ्या या महोत्सवात जागतिक चित्रपट मोफत दाखवले जाणार आहेत. 

शालेय वयातच विद्यार्थ्यांत चित्रपटविषयक जाणिवा विकसित व्हाव्यात आणि त्यांच्यातील माणूस म्हणून घडण्याची प्रक्रिया अधिक सजगपणे व्हावी, या उद्देशाने ही चळवळ सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी शिवाजी मराठा हायस्कूल शाळेत प्रत्येक महिन्याला विद्यार्थ्यांनी एक चित्रपट पाहावा आणि त्यावर चर्चा करावी, या उद्देशाने चित्रपट दाखवले जाऊ लागले. त्यानंतर तो अधिक व्यापक होताना प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी शाहू स्मारक भवनात चित्रपट दाखवला जाऊ लागला. जिल्ह्यातील पन्नासहून अधिक शाळांनी या चळवळीत सहभागी होताना हा उपक्रम आपापल्या शाळेत सुरू केला. दिवाळीच्या सुटीत चित्रपट पाहायला येणाऱ्या विद्यार्थ्यांतील पन्नास विद्यार्थ्यांना निवडून त्यांच्याकडून शॉर्टफिल्म तयार करून घेतल्या गेल्या. मात्र चित्रपट माध्यमाबाबत फारसे सजग नसणाऱ्या कुटुंबातील मुलांनाही चित्रपट पाहता यावेत, यासाठी खास महोत्सवाचे आयोजन करण्याची संकल्पना पुढे आली आणि गेल्या वर्षीपासून महोत्सवाला प्रारंभ झाला. 

महोत्सवात शहराबाहेरील ग्रामीण भागातील विद्यार्थी, आश्रमशाळा आणि बालकल्याण संस्थेतील विद्यार्थ्यांना यंदा विशेष निमंत्रित केले जाणार आहे. येत्या काळात आता जिल्ह्यातील ज्या वाड्या-वस्त्यांवर अजूनही वीज नाही आणि त्यामुळेच मनोरंजनाचे माध्यम उपलब्ध नाही, अशा गावांत जाऊन चित्रपट दाखवले जाणार असल्याचे मिलिंद यादव यांनी सांगितले. 

आम्ही असू लाडके... 
महोत्सवाचे उद्‌घाटन "आम्ही असू लाडके' चित्रपटातील प्रमुख कलाकार गणेश जोशी, प्रशांत सावंत, निखिल डाफळे यांच्या हस्ते होणार आहे. या चित्रपटाने मतिमंद मुलांच्या भावविश्‍वाचा वेध घेत या प्रश्‍नाकडे सजगपणे पाहण्याचा संदेश दिला होता.

Web Title: Chillar Party Festival