चिल्लर चालेल; पण हजार-पाचशेच्या नोटा नको 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - शंभर, पन्नास, दहाच्या नोटाच नव्हे; तर चिल्लर घेऊन आला तरी चालेल... मात्र हजार व पाचशेच्या नोटा आम्ही स्वीकारणार नाही, अशी भूमिका आज आरटीओ कार्यालयाने घेतली. त्यामुळे परवाना शुल्कापासून वाहनांचे कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांची समजूत काढताना आज कार्यालयातील कर्मचाऱ्यांची पुरेवाट झाली. 

आजपासून चलनातून 500 व 1000 च्या नोटा रद्द झाल्याची घोषणा शासनाने केली. रेल्वे, एस.टी., विमानसेवा, औषध दुकान, पेट्रोल पंप अशा सेवांसाठी या नोटा वापरण्यासाठी शासनाने थोडा कालावधी दिला. मात्र महसूल गोळा करणाऱ्या प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) साठी विशेष सवलत दिल्याचा उल्लेख मात्र शासनाने केला नाही. त्यामुळे आज पाचशे व एक हजारच्या नोटा स्वीकारणार नाही, अशी भूमिका कार्यालय सुरू झाल्यापासून कायम ठेवली. वाहनांचे कर, दंडाची रक्कम भरण्यासाठी नागरिकांची आज कार्यालयात मोठी गर्दी होती. त्यांच्याकडून पाचशे व एक हजारच्या नोटा दिल्या जात होत्या. आम्ही शासनाचाच महसूल भरायला आलोय... तो का नाकारताय, अशी विचारणाही केली. यावर कर्मचाऱ्यांकडून शंभर, पन्नास, वीस, दहाच्याच नोटा नव्हे, तर चिल्लरही घेऊन या, आम्ही स्वीकारतो. नाहीतर धनादेश, डी.डी. घेऊन या, आम्ही स्वीकारतो, अशी समर्पक उत्तरे दिली जात होती. त्यामुळे नागरिकांना पाचशे व एक हजारच्या नोटा घेऊन कार्यालयातून माघारी परतावे लागले. 

शासनाच्या आदेशानुसार पाचशे व एक हजार रुपयाच्या नोटा कार्यालयात स्वीकारल्या जाणार नाहीत. धनादेश, डी.डी. अशा पर्यायाचा नागरिकांनी उपयोग करावा. 

- डॉ. डी. टी. पवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी 

Web Title: Chiller will accept But not thousand-five hundred currency notes