झोंबू लागली मिरची; वधारले लिंबू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

तिखटाच्या हंगामाने लसूण १२० वर 
गेल्या महिन्यापूर्वी शंभर रुपयास तीन- पाच किलो लसूण विक्रेते गल्लोगली फिरून विकत होते. टेंपो भरून अगदी ग्रामीण भागातही लसून कर्णा लावून पुकारत विकत होते. मात्र या महिन्यात बहुतेक कुटुंबे वर्षाभराचे तिखट करून ठेवतात. साहजिकच लसणाची मागणी कितीतरी पटीने वाढली आणि विक्रेत्यांनीही त्याचा चांगला लाभ घेतला आहे. आठवडे बाजारात लसूण १२० ते १६० रुपये किलोने प्रतवारी प्रमाणे किरकोळ विकला जात आहे.

सातारा - चवीला तिखट असली, तरी आवश्‍यक असणाऱ्या हिरव्या मिरचीने नागरिकांच्या डोळ्यांत आता पाणी आणले आहे. किलोभर मिरचीला ९० रुपये मोजावे लागत आहेत. उन्हाळ्यामुळे भाज्यांची आवक रोडावू लागली असून, गेल्या आठवड्यात वीस रुपये किलो मिळणाऱ्या वांग्याच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. 

कडक उन्हाळ्यामुळे सर्व भाज्यांचे दर कडाडले आहेत. साधी हिरवी मिरचीही खिशाला झोंबू लागलेली आहे. एरवी दहा-वीस रुपये किलोने विकली जाणारी मिरची थेट ९० रुपयांवर पोचली आहे. 

जिल्ह्यात वाई, सातारा, कोरेगाव, कऱ्हाड तालुक्‍यांचा पश्‍चिम भाग आणि पाटण तालुक्‍यातील काही भागात भाजीपाला केला जातो. मिरचीचे पीक उसाच्या नवीन लागणीत, आल्यात प्राधान्याने घेतले जाते; पण फार थोडे शेतकरी खास मिरचीचे उत्पादन घेतात. पावसाळ्याच्या प्रारंभी मिरचीचे दर हमखास वाढतात. मात्र, यावर्षी हे दर फारच वाढल्याचे जाणवत आहे. सध्या मंडईत ८० ते ९० रुपये किलो दराने मिरची विकली जात आहे. तिची आवकही कमी आहे. बाजारपेठेत वाळकी मिरची १०० पासून पुढे आहे. मात्र, हिरवी मिरचीही तिच्यापेक्षा अधिक भाव खाऊ लागली आहे.

मंडईत पालेभाज्यांमध्ये पालक, चाकवतची पेंडी दहा ते १५ रुपयास आहे. कोथिंबिरीच्या पाच-सहा काड्यांच्या पेंडीला दहा रुपये मोजावे लागत आहेत. भेंडी ५० ते ६०, गवार ८० ते १००, दोडका ६० रुपये किलो, वांगी ४० ते ६० रुपये, शेवगा ६० ते ८० रुपये किलोने किरकोळ विकला जात आहे.

आवक निम्म्यावर
येथील बाजार समितीत गेल्या आठवड्यात रविवारी हिरव्या मिरचीची ५७ क्विंटल आवक झाली होती. ती घटून काल फक्त २६ क्विंटल आवक झाली आहे. तीच तऱ्हा वांग्यांचीही आहे. गेल्या आठवड्या पेक्षा फळ आणि पाले भाज्याच्या आवकेत साधारण ५० टक्‍के घट झाली आहे. मेथीच्या पेंड्यांची आवक गेल्या आठवड्यात तीन हजार जुड्या होती, तर या आठवड्या फक्त १७०० जुड्या आवक झाली आहे. पालेभाज्याची आवक मात्र लक्षणीय घटली आहे. दिलासा एवढाच की कांदा बटाट्याच्या आवकेत व दरात मात्र काही फरक नाही. 

नगास पाच रुपये
उन्हाळ्यात लिंबू पाणी घेण्यावर नागरिकांचा जास्त भर असते, तसेच सरबतासाठी प्राधान्याने लिंबू वापरतात. मागणी वाढल्याने रसाळ लिंबू पाच ते सात रुपयांना एक विकले जात आहे. ग्रामीण भागातील बाजारात मात्र अगदीच छोटी लिंबेही नगास पाच रुपये अशा दराने विकले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chilly Lemon Rate Increase Market