फलटणकरांना चायना मांजाचा फास

किरण बोळे
शनिवार, 20 जुलै 2019

चायना मांजाचा वापर असुरक्षित आहे. पालकांनी आपल्या मुलांना या मांजाच्या वापरापासून परावृत्त करावे व तो घेऊन देणे टाळावे. जर पालकांत व नागरिकांत जागृती झाली तर निश्‍चितपणे गंभीर घटना टळतील व चायना मांजाची विक्रीही बंद होईल.
- वैशाली अहिवळे, नगरसेविका, फलटण नगरपालिका

फलटण शहर - बंदी असतानाही फलटणमध्ये राजरोसपणे चायना मांजाची विक्री सर्रास होताना दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर चायना मांजा विकणाऱ्यांवर कारवाई करण्याबरोबरच पालकवर्गानेही मुलांना त्याचे दुष्परिणाम समजावून सांगणे आवश्‍यक बनले आहे.

फलटण तालुक्‍यात नागपंचमीस परंपरेनुसार मोठ्या उत्साहात व जल्लोषात पतंगबाजीला उधाण येते. त्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक घटक सहभागी होत असतो. काटाकाटी, पेच, गोत खेळण्यासाठी मांजा महत्त्वपूर्ण असतो. सुरवातीस विविध प्रकारच्या धाग्यांपासून तयार करण्यात आलेला मांजा बाजारात उपलब्ध होता; परंतु काही वर्षांपूर्वी चायना मांजाने बाजारात शिरकाव केला आणि बाजारपेठही काबीज केली. रेडी फॉर यूज व मजबूत असणाऱ्या या मांजाकडे तरुणाईही आकर्षिली गेली; परंतु हा चायना मांजा लोकांच्या जीवाला फास बनू लागल्याने या मांजावर बंदी यावी म्हणून सर्वत्र रान उठू लागले व शासनास या मांजाच्या विक्रीवर बंदी आणावी लागली. 

फलटण शहरात मागील काळात चार वर्षाच्या बालकाचा, तर तालुक्‍यातील एका इसमाचा बारामती येथे चायना मांजाने गळा कापून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. अनेक दुचाकीस्वारही जखमी झाले आहेत. समस्त पालक वर्गासह दुचाकीवरून प्रवास करणारे, सायकलस्वार, पायी चालणाऱ्यांनाही चायना मांजाची आजही मोठी धास्ती आहे. चालताना अथवा दुचाकीवरून प्रवास करताना कुठूनही अचानकपणे मांजा समोर येऊन आपल्याला मोठी दुखापत होणार नाही ना? अशी धास्ती सर्वांनाच असते. आजवर अनेकांना गंभीरपणे मांजा कापल्याने धास्तीचे आता भीतीमध्ये रूपांतर झाले आहे.

पूर्वी मजबूत धाग्यापासून बनविण्यात येणाऱ्या मांजाच्या तुलनेत चायना मांजा अधिक स्वस्त व मजबूत असल्याने त्याला मागणीही मोठी आहे म्हणून सर्रासपणे या मांजाची जोरदारपणे चोरटी विक्री होत आहे. त्यामुळे बंदी असली तरी बाजारात त्याची चोरीछुपे मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. त्यामुळे चायना मांजाच्या विक्रीपेक्षा उत्पादनावरच बंदी आणावी, अशीही मागणी व्यक्त होत आहे.

गळ्यामध्ये मेंदूकडे रक्तपुरवठा करणाऱ्या शिरा व श्वास नलिका असतात. मांजाने जर येथील रक्तवाहिनी कापली गेली, तर मोठा रक्तसस्राव होतो. श्वास नलिकेस इजा झाली किंवा ती कट झाली, तर जिवावरच बेतते. म्हणून, चायना मांजाविषयी जनजागृती होणे आवश्‍यक आहे.
- डॉ. एस. डी. गायकवाड,  वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, फलटण

नागरिकांनी पतंग उडविताना चायना मांजाऐवजी पारंपरिक धाग्याचाच वापर करणे आवश्‍यक आहे. नागरिकांनीही आपली व दुसऱ्याची सुरक्षितता लक्षात घेऊन सहकार्य करणे गरजेचे आहे. जे कोणी चायना मांजाची विक्री करीत असतील, तर त्यांची माहिती त्वरित पोलिस ठाण्याला कळवावी.
- प्रताप पोमण, पोलिस निरीक्षक, फलटण शहर पोलिस ठाणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China Manja Dangerous