माझ्यापुढे माढा अथवा बारामतीचा पर्याय : महादेव जानकर

तात्या लांडगे
सोमवार, 4 मार्च 2019

  • महादेव जानकर भाजपकडून उभारणार असल्याची चर्चा 
  • रासप की भाजप अद्यापही अस्पष्टच
  • कोणत्या मतदारसंघातून लढायचे हे आठ दिवसात जाहीर होईल.

सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माझ्यापुढे माढा आणि बारामती असे दोन पर्याय आहेत. मी बारामतीसाठी आग्रही आहे तर दुसरीकडे माढ्यातून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र, कोणत्या मतदारसंघातून लढायचे हे आठ दिवसात जाहीर होईल, असे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.
 
मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील मोदी लाटेत अपेक्षा नसतानाही अनेकजण आमदार, खासदार झाले. परंतु, शेतकरी आत्महत्या, हमीभावाची प्रतीक्षा, कर्जमाफीचा गोंधळ, उसाच्या एफआरपीचा प्रश्‍न यासह अन्य कारणांमुळे सरकारविरोधात शेतकरी नाराज असल्याचे चित्र आहे. जनतेला अद्यापही अच्छे दिन ची प्रतीक्षाच असून विविध समाजाच्या आरक्षणाचेही प्रश्‍न कायम आहेत. मेगा भरतीची प्रतीक्षा आणि खासगी नोकऱ्यांमध्ये घट झाल्याने सुशिक्षित बेरोजगारही नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता रासपची डाळ शिजणार नसल्याने मंत्री जानकर भाजपकडून उभारण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. 

रासप की भाजप अद्यापही अस्पष्टच -
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी मागील काही वर्षांपूर्वी धनगर समाजाला संघटित करुन शाखांच्या माध्यमातून गावोगावी आपली ओळख निर्माण केली. परंतु, भाजपने धनगर समाजाला दिलेले आरक्षणाचे आश्‍वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही. सत्तेत असूनही मागील साडेचार वर्षात जानकरांचा आरक्षणावर आक्रमकपणा पहायला मिळाला नाही. या पार्श्‍वभूमीवर गोपिचंद पडळकर व उत्तम जानकर यांनी राज्यभर दौरे, बैठका घेतल्या. त्यातून त्यांनी समाजाला आरक्षणाबाबत जागृत केले. त्यामुळे आगामी निवडणुकीत 2014 सारखे वातावरण नसल्याने सत्तेत राहण्यासाठी आता महादेव जानकर भाजपकडून उभारण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The choice of Madha or Baramati for me says Mahadev Jankar