चोखामेळानगर व दामाजीनगर या ग्रामपंचायती वगळून महाराष्ट्र हागणदारीमुक्त

हुकूम मुलाणी
रविवार, 29 एप्रिल 2018

शौचालये ज्यांच्याकडे नाहीत त्यांचा समावेश केला तर त्यांना या योजनेचा लाभ मिळून या ग्रामपंचायती कमी काळात हागणदारीमुक्त होतील.

मंगळवेढा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा नुकतीच केली पण तालुक्यातील दामाजी नगर व चोखामेळा नगर या ग्रामपंचायतीमधील पात्र लाभार्थ्यांचा बेसलाईन यादीमध्ये समावेश तब्बल चार वर्षापासून केला नसल्यामुळे यामधील पात्र लाभार्थी अनुदानापासून वंचीत राहिले. प्रशासनाच्या या निष्काळजीपणा बद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

शौचालय नसलेल्या कुटूंबाचे २०१२ मध्ये बेसलाईन सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये महिला कुटूंबप्रमुख, अल्पभूधारक, भूमीहीन, द्रारिद्ररेषेखालील लाभार्थ्याला निर्मल भारत अभियानातून नऊ हजार रुपये अनुदान देण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अभियानाचे स्वच्छ भारत अभियान असे नामकरण केले व अनुदानात वाढ करत ते १२ हजार रुपये केले. तालुक्यामधील ७७ ग्रामपंचायतीचा समावेश यामध्ये यावेळी करण्यात आला. बेसलाईन सर्वेक्षण करताना चोखामेळा नगर व दामाजी नगर या ग्रामपंचायतीचा समावेश नव्हता. नगरपलिकेच्या कार्यक्षेत्रात त्यावेळी हा भाग होता. 

सन २०१३ नंतर आमदार भालके यांच्या प्रयत्नाने चोखामेळा नगर व दामाजी नगर या स्वतंत्र ग्रामपंचायती झाल्यामुळे या दोन ग्रामपंचायतीमधील शौचालय नसलेल्या कुटूंबाचे सर्वेक्षण करुन त्यांना लाभ देणे आवश्यक होते. स्वच्छ भारत अभियानाच्या संकेतस्थळावर अद्यापही या दोन ग्रामपंचायतीची नावे दिसून येत नाहीत. बेसलाईनच्या यादीमध्ये शौचालय नसल्याची नोंद नसेल तर अनुदान मिळू शकते. ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून आजतागायत पंचायत समितीने यामधील कुटूंबाचे स्वतंत्र सर्वेक्षण करुन शौचालय असलेली व नसलेल्या कुटूंबाचा समावेश यादीमध्ये करणे आवश्यक होते. परंतु, प्रशासनाने ऑनलाईन यादीत समावेश केला नसल्यामुळे अनुदान मिळू शकत नाही, याबाबत या दोन ग्रामपंचायतीमधील कुटूंबे ही सुशिक्षित आहेत त्यामुळे बहुतांश कुटूंबाकडे शौचालय देखील आहेत
 
शौचालये ज्यांच्याकडे नाहीत त्यांचा समावेश केला तर त्यांना या योजनेचा लाभ मिळून या ग्रामपंचायती कमी काळात हागणदारीमुक्त होतील. सर्वच कुटूंबाकडे शौचालयाचा वापर होत असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले तर त्या दोन ग्रामपंचायतीदेखील हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर कराव्यात जेणे करुन नवीन शासकीय योजनेचा लाभ मिळण्यास सोयीचे होईल. पण या दोन ग्रामपंचायती बेसलाईन वगळून महाराष्ट्र हागणदारीमुक्त झालाच कसा असा प्रश्न विचारला जावू लागला आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: chokhamelanagar and damajinagr grampanchayat