कोल्हापूरच्या शिक्षणात ख्रिश्‍चन संस्था ‘माईलस्टोन’

डॅनियल काळे
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

कोल्हापुरात शैक्षणिक आणि आरोग्यसेवा समृद्ध करण्‍यात ख्रिश्‍चन संस्थांचा मोलाचा वाटा आहे. एस्तेर पॅटर्न हायस्कूल, आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूल, सेंट झेवियर्स हायस्कूल, होलीक्रॉस, सेव्हंथ डे हायस्कूल, हॉर्वर्ड मेमोरियल हायस्कूल (कोडोली, ता. पन्हाळा)  या शाळांनी शतकभरात शिक्षणक्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. अशा ख्रिश्‍चन संस्थांचा सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाचा मोठा वारसा लाभला आहे. नाताळनिमित्त घेतलेला हा आढावा ...

कोल्हापुरात १८४८ मध्ये एस्तेर पॅटर्न यांनी राजवाड्यात शाळा सुरू केली. अर्थात, या कार्यासाठी त्यांना राजाश्रय मिळाला. राजवाड्यातील मुलींसाठी सुरू झालेली ही शाळा पुढे सर्वांसाठीच खुली झाली. या शाळेसाठी नागाळा पार्कात जागा दिली. १८४८ मध्ये सुरू झालेली पहिली मुलींची शाळा म्हणून या शाळेचा लौकिक आहे. राजघराण्यातील मुलींसोबतच समाजातल्या गरजू, गरीब मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम त्या काळात केले.

या पाठोपाठच कोल्हापुरात आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूल या शाळेलाही शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी या शाळेसाठी जागा दिली. या शाळेला शेतीपासून उत्पन्न असावे, या उदात्त हेतूने शाहूंनी शाळेला जागा दिली. सुमारे शंभर वर्षांत विविध क्षेत्रांत या शाळेचे विद्यार्थी चमकत आहेत. मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम अशा दोन्ही प्रकारच्या शाळा येथे आहेत.

कोल्हापुरात इंग्रजी माध्यमांची शाळा सेंट झेवियर्स हायस्कूल, होलीक्रॉस हायस्कूल आणि सेव्हंथ डे यांच्या रूपाने सुरू झाल्या. सेंट झेवियर्स हायस्कूल व होलीक्रॉस या शाळांनी आजही दर्जा चांगला ठेवला आहे. तर दिल्ली बोर्ड असलेल्या सेव्हंथ डे ॲडव्हेनटिस्ट या शाळेनेही  लौकिक मिळविला आहे.

कोडोली (ता. पन्हाळा) येथील हॉर्वर्ड मेमोरियल स्कूलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची कवाडे खुली झाली. या शाळेने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात मोठे योगदान उचलले आहे. या शाळेची वाटचालही शंभरीकडे सुरू आहे. तत्कालीन काळात या शाळेने हे चांगले योगदान दिले असले तरी बदलत्या काळातही या शाळांनी दर्जा टिकवायला हवा. सुसज्ज इमारत, प्रशस्त मैदाने, इतिहासाची परंपरा याचा फायदा घेत काळानुरूप बदल करत या शाळांची प्रगतीकडे घोडदौड सुरू आहे.

शाळेचा रजिस्टर नंबरच एक

एस्तेर पॅटर्न हायस्कूल ही मुलींची पहिली शाळा त्या काळात सुरू झाली. या शाळेचा रजिस्टर क्रमांकही एकच आहे. त्यामुळे ही शाळा पहिली असावी, असाही काही जणांचा दावा आहे. आजदेखील ही शाळा सुरू आहे. काही वर्षांत पटसंख्येला फटका बसू लागल्याने मुलामुलींसाठी ही शाळा सुरू आहे.

Web Title: Christian Institute Milestone in Kolhapur Education