सीआयडीचे काम फारच आव्हानात्मक! 

pune.jpg
pune.jpg

सोलापूर : सीबीआय केंद्र सरकारच्या अंतर्गत आणि सीआयडी ही राज्य सरकारच्या अंतर्गत कार्य करते. दोन्ही विभागांची कार्यपद्धती सारखीच आहे. सीआयडीचे काम फारच आव्हानात्मक आहे. कारण, अनेक गुन्हे बऱ्याच कालावधीनंतर आमच्याकडे येतात. पोलिस कोठडीतील मृत्यू आणि इन्कॉन्टरमधील मृत्यूची चौकशी सीआयडीमार्फत केली जाते. आर्थिक गुन्ह्यांचा तपास सीआयडीच्या पथकामार्फत केला जातो. सीसीटीएनएस या पोलिस ठाण्याच्या नेटवर्किंगवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सीआयडीवर आहे. या माध्यमातून नागरिकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न आहे, असे राज्याच्या सीआयडी विभागाचे प्रमुख, अपर पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी 'कॉफी विथ सकाळ'मध्ये सांगितले. 'सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी अपर पोलिस महासंचालक कुलकर्णी यांचे स्वागत केले.

''चित्रपट, मालिकांत दाखविण्यात येणाऱ्या सीआयडीच्या कामात आणि प्रत्यक्षातील सीआयडी काम करण्याच्या प्रक्रियेत खूप फरक असतो. माहिती तंत्रज्ञानातील बदलांनुसार पोलिसांना बदलावे लागते. शहर आणि जिल्ह्यातील गुन्ह्यांचा अभ्यास करून सीआयडीच्या माध्यमातून प्रत्येक शहर आणि जिल्हा पोलिस दलास कळविण्यात येणार आहे,'' असे सांगून अपर पोलिस महासंचालक कुलकर्णी म्हणाले, "आयबीमध्ये असताना अरुणाचलमध्ये काम केले. तिथे आंतरराष्ट्रीय विषयावर काम करावे लागत होते. ते काम खूपच आव्हानात्मक होते. शांतीसेनेत असताना सांभाळलेल्या जबाबदारीची माहिती त्यांनी दिली.
 
"देशातील प्रत्येक नागरिकाला एकसारखा सन्मान मिळायला हवा. प्रत्येक नागरिक आपले कर्तव्य चांगल्याप्रकारे पार पाडत आहे. सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहेतच, पण प्रत्येकाने दक्ष असावे. स्मार्ट सिटीच्या दिशेने जाताना सोलापूरकरांनी आपली मानसिकता बदलणे आवश्‍यक आहे,'' असे अपर पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी "कॉफी विथ सकाळ'मध्ये सांगितले. 

128 तरुणांचे केले मनपरिवर्तन 
दहशतवाद विरोधी पथकाचा प्रमुख म्हणून तीन वर्षे काम केले. सहकाऱ्यांच्या मदतीने या कालावधीत आम्ही दहशतवादावरील उपाययोजनांची आखणी केली. फक्त कारवाई करणे हे आमचे टार्गेट नव्हते. दहशतवादी विचारांच्या सानिध्यात गेलेल्या तरुणांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. यात अनेक उच्चशिक्षित तरुणांचा सहभाग होता.  माझ्या कालावधीत 128 तरुण-तरुणींना दहशतवादी कारवायांच्या प्रवाहात जाण्यापासून रोखण्यात यश आले. या कामासाठी आम्ही धर्मगुरुंचीही मदत घेतली. त्या तरुणांशी मैत्रीपूर्ण नाते निर्माण केल्यानेच आम्हाला यात यश आले आहे. 

मानसिकता बदलण्याची आवश्‍यकता 
वालचंद कुटुंबीयांनी सोलापुरात काही कारखाने चालू केले होते. तेथील मानसिकता पाहून वालचंद कुटुंबीयांनी सोलापुरातील कारखाने बंद करून इथे सामाजिक काम करण्याचा निर्णय घेतला. स्वच्छतेबाबत आपण मागे आहोत. मॅकेनिक चौक गेल्या 30 वर्षांपासून जसा आहे तसाच आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने जाताना सोलापूरकरांनी आपली मानसिकता बदलणे आवश्‍यक आहे. प्रत्येकाचा सकारात्मक दृष्टिकोन असायला हवा. 

..अन्‌ पोलिसांविषयी माझा आदर वाढला 
परदेशातील पोलिसिंग मी पाहिले आहे. आपल्याकडील पोलिस कॉन्स्टेबल बोलता बोलता दोन हजार लोकांचा मोर्चा हाताळू शकतो. तिकडे 200 लोकांचा मोर्चा सांभाळण्यासाठी 300 पोलिस बोलवावे लागतात. हे आपल्याकडील पोलिसांचे कौशल्य आहे. ते पाहून आपल्याकडील पोलिसांविषयी माझा आदर अधिकच वाढला. शांतीसेनेच्या माध्यमातून जवळपास एक वर्ष मी परेदशात होता. तेथील पोलिसिंगचा अभ्यास केला. परदेशातील सुविधांच्या तुलनेत आपल्याकडील सुविधा अधिक चांगल्या आहेत. आपल्याकडे आरोग्य सुविधा खूपच चांगल्या मिळतात. लोकसंख्या इतकी असतानाही रेल्वेची सुविधा अधिकाधिक चांगल्याप्रकारे देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातो. ही आपल्याकडील सकारात्मक बाजू आहे. 

- सीआयडी सर्वात जुना विभाग 
- 1905 ला स्थापना झाला आहे. 
- येथे कोणाचाही मुलाहिजा ठेवला जात नाही. 
- आजपर्यंत काम करताना कोणाचाही दबाव आला नाही. 

आवड : हिंदुस्थानी क्‍लासिकल संगीत ऐकणे 
आवडता चित्रपट : सरफरोश 
आवडता अभिनेता : नवाजुद्दीन सिद्दीकी 
आवडते खाद्यपदार्थ : पुरणपोळी 

समुपदेशन मॉडेल देशभरात.. 
दहशतवादी विचारांपासून दूर आणून अनेक तरुणांना केंद्र आणि राज्य सरकारच्या ग्रामीण विकास योजनेतून प्रशिक्षण देऊन रोजगार करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले. आपल्या भागातील एक तरुण परगावात इंजिनिअरिंगला होता. वडील टेलरिंग काम करून घर सांभाळत. आम्ही त्याचे मन परिर्वतन करून मुख्य प्रवाहात आणले. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शासकीय योजनेतून रोजगार मिळवून दिला. दहशतवादापासून तरुणांना परावृत्त करण्यासाठी दहशतवाद विरोधी पथकाने समुपदेशनासाठी बनवलेले डीरॅडिकलायझेशनचे मॉडेल काश्‍मीरसह देशातील अन्य राज्यांत उपयोगात आणण्यात येत असल्याचे अपर पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी आवर्जून सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com