साथी हात बढाना...सातारकरांनी दिल्या दीड लाख चपात्या

सिद्धार्थ लाटकर
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

जिल्हा प्रशासनाकडे आज (शनिवार) नागरीकांनी, सामाजिक संस्थांनी विविध प्रकारची मदत सुपुर्द केली.

सातारा ः शहरातील विविध सामाजिक संस्थांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केलेल्या आवाहनानंतर दोन दिवसांत तब्बल दीड लाख चपाती, भाकरी, पराठा तसेच विविध प्रकारच्या भाज्या जमा झाल्या. ही अन्न पदार्थाची मदत 22 वाहनांच्या माध्यमातून पाटण, सांगली, कर्नाळा, शिरोळ, आष्टा आदी तालुक्‍यांमध्ये पाठविण्यात आली. याबरोबरच जमा झालेले कपडे देखील विविध ठिकाणी पाठविण्यात आले. 
सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांनी एसटी कॅन्टींन येथे चपाती व भाजी आणून द्यावी असे आवाहन गुरुवारी (ता.8) केले होते. त्यानूसार मदतीचा ओघ सुरु झाला. दरम्यान मिळालेली अन्न पदार्थांची मदत पूरेशी असल्याचे स्वयंसेवकांकडून सांगण्यात आले. 
दरम्यान पूरग्रस्तांना जिल्हावासीयांनी मदत करावी. ही मदत ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, पोलिस ठाण्यामध्ये जमा करावी. नागरिकांनी ब्लॅंकेट, धान्य, बिस्किटे यासह जीवनावश्‍यक वस्तूंची मदत करावी, तसेच धनादेश देऊन मदत करावयाची असल्यास धनादेश मुख्यमंत्री साहाय्यता निधी (पूर) या नावाने द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे.

या मदतीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. (9604146186) कुणालाही पूरग्रस्तांना मदत करावयाची असल्यास त्यांच्याशी संपर्क साधावा. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens of satara are helps flood affected area