esakal | नागरिकांनी विना कारण प्रवास टाळावा...तालुका बॉंर्डर सील करण्याचा विचार : मंत्री विश्‍वजित कदम
sakal

बोलून बातमी शोधा

Vishvajeet kadam.jpg

पलूस(सांगली)-  पलूस, कडेगाव तालुक्‍यात कोरोना पॉंझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असली तरी परिस्थितीवर प्रशासनाचे पूर्ण नियंत्रण आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर प्रवास करणे टाळावे. असे आवाहन कृषी व सहकार राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी पलूस येथे पत्रकार परिषदेत केले. 

नागरिकांनी विना कारण प्रवास टाळावा...तालुका बॉंर्डर सील करण्याचा विचार : मंत्री विश्‍वजित कदम

sakal_logo
By
संजय गणेशकर

पलूस(सांगली)-  पलूस, कडेगाव तालुक्‍यात कोरोना पॉंझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असली तरी परिस्थितीवर प्रशासनाचे पूर्ण नियंत्रण आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर प्रवास करणे टाळावे. असे आवाहन कृषी व सहकार राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी पलूस येथे पत्रकार परिषदेत केले. 

पलूस येथे कोरोनाचे पार्श्वभूमीवर झालेल्या प्रशासनाच्या बैठकीनंतर डॉ. कदम यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन करित असलेल्या उपाययोजनांची पत्रकार परिषदेत माहिती दिली. 
डॉ. कदम म्हणाले, पॉंझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. म्हणून नागरिकांनी अजिबात घाबरू नये. प्रशासन योग्य ती उपाययोजना करुन रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करित आहेत. पॉंझिटिव्ह रुग्ण वाढलेच तर त्यासाठी पलूस येथील ग्रामीण रुग्णालय, दोन वसतिगृहे, ऍकॅडमी आदी ठिकाणी 400 बेडची सोय केली आहे. कडेगाव येथे ग्रामीण रुग्णालय व इतरत्र 250 बेडची सोय करण्यात आली आहे. 

डॉ. कदम म्हणाले, पलूस व कडेगाव तालुक्‍यातील कोरोना परिस्थितीचा प्रत्यक्ष संबंधित गावांना भेटी देऊन आढावा घेतला. संबंधित पॉंझिटिव्ह रुग्ण, कंटेनमेंट झोन मधील व क्वारंन्टाईन असलेल्या नागरिकांना अन्नधान्य, पाणी, औषध व ईतर जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पलूस व कडेगाव तालुका कॉंग्रेस समितीच्या वतीने कोरोना पॉंझिटिव्ह रूग्ण सापडलेल्या गावातील नागरिकांना आरसेनिक औषधाचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. असे डॉ. कदम यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक महेंद्र लाड, तहसीलदार राजेंद्र पोळ, पलूस तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष ए.डी. पाटील, कडेगाव तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रकाश जाधव, घन:शाम सुर्यवंशी, सुनिल जगदाळे, सुहास पुदाले, बी. डी. पाटील, विजय मोहिते , संग्राम पाटील व कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

तालुका बॉंर्डर सील करण्याचा विचार

सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढतोय.काही नागरिक विनाकारण तालुक्‍यात व ईतर तालुक्‍यात जातात. त्यामुळे गर्दी वाढते आहे.फक्त कामानिमित्त ग्रामसमितीची परवानगी घेऊन नागरिकांनी बाहेरील तालुक्‍यात जावे.यासाठी तालुका बॉंर्डर नियंत्रित करता येतील का ? यावर प्रशासनाला विचार करण्याची सूचना केल्याचे डॉ. विश्वजित कदम यांनी सांगितले. 

संपादन : घनशाम नवाथे