सोलापूरकरांनी अनुभवली बिनभिंतीची उघडी शाळा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

सोलापूर : "बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरू.. झाडे, वेली, पशू, पाखरे यांच्याशी गुजगोष्टी करू..' अशाच काहीशा वातावरणात मंगळवारी सकाळी स्मृतिवन उद्यानात निसर्ग भ्रमंती करण्यात आली. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने "सकाळ'ने आयोजित केलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांसह शेकडो सोलापूरकरांनी सहभाग नोंदविला. 

सोलापूर : "बिनभिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरू.. झाडे, वेली, पशू, पाखरे यांच्याशी गुजगोष्टी करू..' अशाच काहीशा वातावरणात मंगळवारी सकाळी स्मृतिवन उद्यानात निसर्ग भ्रमंती करण्यात आली. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने "सकाळ'ने आयोजित केलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांसह शेकडो सोलापूरकरांनी सहभाग नोंदविला. 

सामाजिक वनीकरण विभाग, सुवर्ण स्पोर्टस्‌ अकॅडमी यांच्या सहकार्याने निसर्ग भ्रमंतीचा उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी, सुवर्ण पदक विजेते संजय भोईटे यांनी स्मृतिवन उद्यानातील झाडांसह पशू-पक्ष्यांची इत्थंभूत माहिती सांगितली. विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना सोप्या शब्दात उत्तरेही दिली. वड प्रजातीच्या दोन वेगवेगळ्या झाडांची पाने दाखवत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. आपल्यापैकी अनेकांनी वडाचे झाड पाहिले आहे.. पण कृष्ण वड कोणी पाहिला आहे का असा प्रश्‍न विचारत श्री. भोईटे यांनी स्मृतिवन उद्यानात एकमेव असलेल्या कृष्ण वडाची माहिती दिली. चमच्यासारखा आकार असलेल्या कृष्ण वडाच्या पानाने श्रीकृष्णाने लोणी खाल्ले होते म्हणून याला कृष्ण वड असे म्हणतात असा पौराणिक संदर्भही सर्वांना सांगितला. 

प्लास्टिक कॅरिबॅग, शीतपेयाच्या प्लास्टिक, बिस्किटांचे रॅपर यासह इतर कचरा फलकावर चिटकावण्यात आला होता. त्यावर अशी सजावट आपल्या घरात चालेल काय? असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. पर्यावरण अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळून कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन केले. बहावा वृक्षाची माहिती देताना डॉ. कुंभार यांनी पु.ल.देशपांडे यांच्या "बहावा.. उन्हात पाहावा मग म्हणावे वाहव्वा..' या ओळी आवर्जून सांगितल्या. निसर्ग परिचय केंद्रातील विविध पशू-पक्ष्यांची छायाचित्रे पाहताना सर्वांनी उत्सुकतेने अधिक माहिती जाणून घेतली. सत्तावीस नक्षत्रावर आधारित नक्षत्र वनातील औषधी झाडांची माहिती यावेळी सांगण्यात आली. सुवर्ण स्पोर्टस्‌ अकॅडमीचे विद्यार्थी, निर्मलाताई ठोकळ प्रशालेतील स्काउट गाईडचे विद्यार्थी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिज्ञा क्षीरसागर या चिमुकलीने हिरवा निसर्ग हे गाणं सादर करून सर्वांचे लक्ष वेधले. "सकाळ'चे मुख्य उपसंपादक संजय पाठक यांनी प्रास्ताविक केले. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपणही करण्यात आले. 

पर्यावरण संवर्धनासाठी हे करा.. 
- प्लास्टिक कॅरिबॅग टाळा. 
- कापडी पिशव्यांचा वापर करा. 
- जुन्या कपड्यांपासून बनवा पिशव्या. 
- वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करा. 

सामाजिक वनीकरण विभागाचे वनअधिकारी सुवर्णा माने, वनपाल शहाजी देशमुख, जे. डी. दाभाडे, वनरक्षक एम. बी. हिरेमठ, शीतल बडबडे, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेविका संगीता जाधव, सुवर्ण स्पोर्टस्‌ अकॅडमीचे संस्थापक चन्नेश इंडी, सदस्य सपना मॅगेरी, वैष्णवी ओगले, कोमल सुरवसे, प्रशांत गायकवाड, निर्मलाताई ठोकळ प्रशालेतील स्काउट गाईडचे शिक्षक अर्जुन सुरवसे, युसूफ शेख आणि विद्यार्थी, इको फ्रेंडली क्‍लबचे उपाध्यक्ष भाऊराव भोसले, सदस्य किरण पवार, महेंद्र राजे, प्रचेत बागेवाडीकर, स्वाती इंगळे, ऍड. मंजुनाथ कक्कळमेली, सुनील दुस्सल, अशोक बिराजदार-पाटील, रोटरॅक्‍ट क्‍लबचे बसवराज जमखंडी, इको नेचरचे मनोज देवकर, सुनील बिराजदार, मिटकॉनचे रोहित भालेराव.

Web Title: citizens of solapur experienced school without wall