मोकाट जनावरांचा राशीनकरांना मनस्ताप 

दत्ता उकिरडे
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

राशीन शहरात अनेक दिवसांपासून मोकाट जनावरांचा त्रास वाढला आहे. दीड ते दोन वर्षांपूर्वी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी कैलास तरटे यांनी मोकाट जनावरांच्या मालकांना नोटीस काढून त्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

राशीन : मोकाट जनावरांच्या कळपाने राशीनकरांना अक्षरश: त्रस्त करून सोडले आहे. बाजारपेठेतील मुख्य रस्ते आणि राज्यमार्गावर जनावरे ठिय्या देतात. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. त्याचा त्रास वाहनचालकांसह बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना सहन करावा लागतो. 

राशीन शहरात अनेक दिवसांपासून मोकाट जनावरांचा त्रास वाढला आहे. दीड ते दोन वर्षांपूर्वी तत्कालीन ग्रामविकास अधिकारी कैलास तरटे यांनी मोकाट जनावरांच्या मालकांना नोटीस काढून त्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

कारवाईच्या भीतीपोटी जनावरे कमी झाली होती. परंतु आता पहिल्यापेक्षा जास्त जनावरांचे कळपच्या कळप आहेत. गायी, बैल आणि वासरांचाही त्यात मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ग्रामपंचायतीकडे याबाबत अनेक वेळा तक्रारी होतात. मात्र, या जनावरांवर कारवाई केली जात नाही. 

आठवडे बाजारातही घुसून विक्रीला मांडलेल्या भाज्या मुसंडी मारून ही मोकाट जनावरे खाऊन विक्रेत्यांना नको-नकोसे करतात. भाजी नेण्यासाठी बाजारात आलेल्या महिला-मुलांनाही ही जनावरे हुंदडतात. त्यामुळे लोकांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या कळपात एक वळू आहे. त्याने अनेकांना धडक देऊन जखमी केले आहे. 

शिवाजी पुतळा, महात्मा फुले चौक, भिगवण रस्ता, सिद्धटेक रस्ता, करमाळा रस्ता या ठिकाणी या मोकाट जनावरांचा कळप असतो. त्यामुळे चालकांना यातून वाट काढून निघावे लागते. या सर्व मोकाट जनावरांचा बंदोबस्त ग्रामपंचायतीने करावा, अशी मागणी बाजारपेठेतील व्यापारी, चालक आणि ग्रामस्थांमधून होत आहे. 

अन्यथा जनावरांचा लिलाव 
मोकाट जनावरांच्या मालकांना नोटीस दिली आहे. मात्र, त्यांनी बंदोबस्त न केल्यास लवकरच संबंधित जनावरांचा ग्रामपंचायतीतर्फे लिलाव करून विक्री करून मालकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. 
- नीलम साळवे, सरपंच 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens suffer due to animals