The city will be clean by Saturday!
The city will be clean by Saturday!

नगर शनिवारपर्यंत होणार स्वच्छ!

नगर  आमदार संग्राम जगताप यांनी आज अचानक थेट महापालिकेत जाऊन दोन्ही उपायुक्‍तांना शहरातील अस्वच्छतेचे दर्शन घडविले. त्यामुळे शहरातील कचरासंकलनाचा कार्यारंभ आदेश आज सायंकाळी महापालिका प्रशासनाने काढला. त्यानुसार बुधवारी सकाळपासून पुण्याचे स्वयंभू ट्रान्स्पोर्ट 45 वाहनांद्वारे शहरात कचरासंकलन सुरू करणार आहे. शहर शनिवारपर्यंत स्वच्छ झालेले असेल, असा विश्‍वास महापालिका प्रशासनाने आमदार संग्राम जगताप यांना दिला.
नगर शहरात दोन महिन्यांपासून कचऱ्याचा प्रश्‍न चिघळला आहे. त्यामुळे शहरात जागोजागी कचरा व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याच्या कडेला, रिकाम्या जागांवर गवत वाढले आहे. त्यामुळे शहरात डासांचा आणि परिणामी डेंगीचा प्रादुर्भावही वाढला आहे. शहरातील रस्ते व दुभाजकांचीही दुरवस्था झाली आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत होता.

निवडणुकीची व सत्कारांची धामधूम सरताच आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील प्रश्‍नांकडे लक्ष देण्यास सुरवात केली आहे. शहरातील रस्त्यांच्या समस्येबाबत त्यांनी महापालिकेला निवेदनाद्वारे इशारा दिला होता. शहरातील स्वच्छतेबाबतचे काम होत नसल्याने जगताप यांनी आज महापालिकेत जाऊन कर उपायुक्‍त सुनील पवार व सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्‍त डॉ. प्रदीप पठारे यांना सोबत घेऊन शहरभर फिरविले आणि स्वच्छतेचा आढावा घेतला. त्यानंतर जुन्या महापालिकेत दोन्ही उपायुक्‍तांसोबत चर्चा करून निवेदन दिले. या वेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, मुख्य स्वच्छता निरीक्षक अन्वर शेख, यंत्र अभियंता परिमल निकम आदी उपस्थित होते.

रोज सकाळी शहरात फिरणार ः  जगताप

आमदार जगताप म्हणाले, ""मी नुकताच नवी मुंबईत गेलो होतो. तेथील महापालिकेत आपल्यासारखे अधिकारी नाहीत. शहरात कचरा असणे तुम्हाला व आम्हालाही लाजिरवाणे आहे. मीही पूर्वी महापालिकेत काम पाहिले आहे. शहराची अशी अवस्था कधीच झाली नव्हती. दोन महिन्यांपासून शहरात कचरासंकलनाचे काम योग्य झालेले नाही. मागे काय झाले याची कारणे देत बसू नका. आता काय करायचे याबाबतचा आराखडा सायंकाळपर्यंत बैठक घेऊन निश्‍चित करा. स्वयंभू ट्रान्स्पोर्टला कचरासंकलनाचे काम देण्याचा ठराव महापालिकेने मंजूर केला आहे. त्यांच्याकडून काम का सुरू झाले नाही? स्वयंभू ट्रान्स्पोर्टला आज सायंकाळपर्यंत कार्यारंभ आदेश द्या. ही संस्था शहरातील सर्व कचऱ्याचे संकलन करणार आहे. स्वयंभू ट्रान्स्पोर्ट बुधवारपासून काम सुरू करील. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांना केवळ रस्ते, गल्ल्या स्वच्छ करून कचरा एका ठिकाणी ठेवायचा आहे. तेथून "स्वयंभू'ची वाहने कचरा संकलित करून घेऊन जातील. त्यामुळे महापालिकेला स्वच्छतेसाठी कमी कर्मचारी लागतील. रिकामे कर्मचारी शहरस्वच्छतेच्या कामाला लावा. मी रोज सकाळी सात वाजता शहरात फिरून स्वच्छतेचा आढावा घेणार आहे. शहरातील रस्त्यांवर मातीही दिसता कामा नये.''


नगरला "थ्री-स्टार' बनविण्याचा विश्‍वास

आमदार जगताप यांच्या भूमिकेवर महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले, की शनिवारपर्यंत शहरात कचरा दिसणार नाही. नगर महापालिकेला स्वच्छतेबाबत "थ्री-स्टार' बनवू, असा विश्‍वास त्यांनी जगताप यांनी दिला.

हॉटेलचा कचरा मध्यरात्रीच उचलणार

शहरातील हॉटेलचे काम रात्री 12 वाजेपर्यंत उरकते. त्यानंतर लगेच स्वयंभू ट्रान्स्पोर्ट हॉटेलच्या बाहेरून त्यांचा कचरा संकलित करणार आहे. हॉटेल व्यावसायिकांना हॉटेलचा कचरा हॉटेलच्या गेटसमोरच ठेवण्याचा आदेश देण्यात येणार आहे.
......

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com