'शिवेंद्रबाबा-उदयन महाराजांना सुद्धा मी सांगून दमलो'

सिद्धार्थ लाटकर
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

साताऱ्याच्या विकासात दोन्ही नेत्यांचा वाटा आहे असे मानणारे नागरिक आता मात्र क्षुल्लक प्रश्‍न ही नेते मंडळी सोडवत नाहीत, असे जाहीरपणे बोलू लागले आहेत. सदरबझार येथे अंतर्गत रस्ता होत नसल्याने एका ज्येष्ठ नागरीकाने नगराध्यक्षांसमोरच अधिकाऱ्यांना सुनावले.

सातारा : गेल्या काही दिवसांपासून सातारा पालिकेच्या नगराध्यक्षा माधवी कदम या पालिका आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून शहरातील विविध प्रभागांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. या पाहणी दौऱ्यात नगराध्यक्षांसमवेत स्थानिक नगरसेवक-नगरसेविका असतात. नगराध्यक्षांचे प्रभागात पाऊल पडताच नागरिक त्यांच्या समस्यांचा गाठोडेच त्यांच्या पुढे उघडतात. कोणाची कचरा उचलला जात नसल्याची तक्रार तर कोणाची रस्त्यांवरील दिवा बत्तीची अशा (वैयक्तिक नव्हे) अनेक सार्वजनिक तक्रारी ऐकून नगराध्यक्षा लगेच त्याचे निराकारण व्हावे, यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना ही करतात. खर तर साताऱ्याचे नागरिक (कार्यकर्ते) खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या पैकी एकाचे नेतृत्व मानतात. नव्या-जून्या नागरीकांच्या प्रेमापोटी हे दोन्ही नेते त्यांच्या सुख-दुखाःच्या प्रसंगी आर्वजुन भेटी देतात हे सातारकर जाणतातच. पालिका आपल्या दारी या नगराध्यक्षांच्या पाहणी दौऱ्यात तर पावलोपावली त्याची प्रचिती येत आहे.

साताऱ्याच्या विकासात दोन्ही नेत्यांचा वाटा आहे असे मानणारे नागरिक आता मात्र क्षुल्लक प्रश्‍न ही नेते मंडळी सोडवत नाहीत, असे जाहीरपणे बोलू लागले आहेत. सदरबझार येथे अंतर्गत रस्ता होत नसल्याने एका ज्येष्ठ नागरीकाने नगराध्यक्षांसमोरच अधिकाऱ्यांना सुनावले.

ते म्हणाले, "मला बघितले की हे पळतात. का मी वाघ आहे व्हय खाऊन टाकीन म्हणून...एका नागरीकाने त्यांना शांत रहा असे सांगताच त्यांचा पारा चढला तुम्ही गप बसा. मला माहितीये. नगराध्यक्षांकडे बोट दाखवित मी पुर्ण ओळखतो यांना, तुम्ही आत्ता ओळखत असाल. राजूला (नगरसेविका रजनी जेधे यांचे पती) सुद्धा ओळखतो. या रस्त्यावर म्हातारी माणसे पडतात. आता 76 वय झाले माझे. शिवेंद्रबाबा येतात...उदयनमहाराज येतात घरी. त्यांना सुद्धा मी सांगून दमलो''. त्यावर नगराध्यक्षांनी तातडीने रस्ता दुरुस्त केला जाईल असे आश्‍वासन देत काढता पाय घेतला.

Web Title: civic problems in Satara Udyanraje bhosale not solved