‘सिव्हिल’मध्ये आठ दिवसांत सीटी स्कॅन

प्रवीण जाधव
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये एक्‍सरे व सोनोग्राफी चाचणीची सुविधा आहे. काही जिल्हा रुग्णालयांत त्यांच्या जोडीला सीटी स्कॅनची सोयही आहे. तशी ती साताऱ्यातही होती. मात्र, आधुनिक यंत्रांनी सुसज्ज असा रेडिओडायग्नोस्टिक विभाग सुरू करण्याचे गाजर दाखवत माजी मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यातील सीटी स्कॅन मशिन कऱ्हाडला हलविण्याचा घाट घातला.

सातारा - जिल्हा रुग्णालयात नव्याने आलेले सीटी स्कॅन मशिन बसविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना आठ ते दहा दिवसांत सीटी स्कॅनची सुविधा उपलब्ध होणार आहे.

राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये एक्‍सरे व सोनोग्राफी चाचणीची सुविधा आहे. काही जिल्हा रुग्णालयांत त्यांच्या जोडीला सीटी स्कॅनची सोयही आहे. तशी ती साताऱ्यातही होती. मात्र, आधुनिक यंत्रांनी सुसज्ज असा रेडिओडायग्नोस्टिक विभाग सुरू करण्याचे गाजर दाखवत माजी मुख्यमंत्र्यांनी साताऱ्यातील सीटी स्कॅन मशिन कऱ्हाडला हलविण्याचा घाट घातला. त्यानुसार येथील सीटी स्कॅन मशिन कऱ्हाडला हलविली. परंतु, येथील विभाग मात्र अद्याप सुरू झालेला नाही. त्यामुळे सुमारे चार वर्षांपासून जिल्हा रुग्णालयातील सीटी स्कॅन चाचणी बंद आहे. नवीन विभागामध्ये एमआरआय, सीटी स्कॅन, डिजिटल एक्‍सरे, टू डी इको, कलर डॉप्लर व सोनोग्राफीच्या चाचण्या होणार, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र, येथील सुरू असणारी सीटी स्कॅन यंत्रणाही बंद पडली.  

जिल्ह्यातून मोठा महामार्ग जातो. या ठिकाणांवरील अपघातग्रस्त तसेच इतर राज्य मार्गावरील अपघातामधील गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले जाते. इतर आजारातील रुग्णांनाही या सुविधेची गरज असते. परंतु, सीटी स्कॅनअभावी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची फरपट होत होती. डॉ. अमोद गडीकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही बाब गांभीर्याने घेतली.

सिटी स्कॅन मशिन उपलब्ध होण्यासाठी त्यांनी तातडीने प्रयत्न सुरू केले. आरोग्यमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. त्यामुळे गेल्या महिन्यात जिल्हा रुग्णालयाला सिटी स्कॅन मशिन उपलब्ध झाले. नव्या मशिनबरोबर विजेच्या सर्व ताराही नव्याने बसविण्याबाबतच्या सूचना डॉ. गडीकर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार मशिन बसविण्याची खोली तयार करण्याबरोबरच विजेच्या तारा व अन्य साधनेही नवी बसविण्याची प्रक्रिया गेला महिनाभर सुरू होती. ती पूर्ण झाली आहे. आता सिटी स्कॅन मशिनची चाचणी घेतली जात आहे. मशिनच्या वापरातून किती रेडिएशन्स बाहेर पडतात, याची तपासणी होत आहे. रेडिएशनचे प्रमाण योग्य पातळीवर असल्यानंतर रुग्णांची प्रत्यक्ष चाचणी सुरू होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना अत्यल्प दरात सिटी स्कॅनची सुविधा उपलब्ध होणार आहे. अपघातातील जखमींवरही तातडीने उपचार करणे शक्‍य होणार असून, तपासणीसाठी बाहेर नेण्यासाठी रुग्ण व नातेवाईकांची होणारी परवडही थांबणार आहे.

सीटी स्कॅन मशिन बसविण्याची सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण करून घेतली आहे. रेडिएशन पातळी तपासण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर मशिन रुग्णांसाठी उपलब्ध होईल.
- डॉ. अमोद गडीकर (जिल्हा शल्यचिकित्सक)

Web Title: Civil Hospital City Scan Machine