प्राथमिक आरोग्य केंद्रे ‘सलाईन’वर!

हेमंत पवार
शनिवार, 6 मे 2017

कऱ्हाड -जिल्ह्यात ७१ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह अनेक आरोग्य उपकेंद्रे सुरू आहेत. त्याद्वारे ग्रामीण भागातील रुग्णांची चांगली सोय झाली. मात्र, त्याला आता डॉक्‍टरांच्या रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. जिल्ह्यात आरोग्य केंद्रासाठी मंजूर १५२ डॉक्‍टरांच्या पदांपैकी तब्बल ३२ पदे रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा ‘सलाईनवर’च जाण्याची वेळ आली आहे. अनेक आरोग्य केंद्रांतील डॉक्‍टरांवर दोन-दोन आरोग्य केंद्रांचा भार आहे. त्यामुळे त्यांच्यावरही सेवा देताना मर्यादा येवू लागल्या आहेत. 

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील, वाडी-वस्तींवरील रुग्णांना आरोग्याची चांगली सेवा मिळावी यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठ्या गावाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली. त्याचबरोबर संबंधित गावच्या जवळपासच्या गावातील रुग्णांच्या लसीकरणासारख्या काही सोयीसाठी आरोग्य उपकेंद्रेही सुरू करण्यात आली आहेत. त्या माध्यमातून संबंधित गावांतील रुग्णांची चांगली सोयही झाली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत संबंधित आरोग्य केंद्रांसाठी डॉक्‍टरांची १५२ पदे मंजूर करण्यात आली. त्याव्दारे आरोग्य केंद्राचा कारभार सुरू होता. मात्र, अलीकडे शासकीय सेवेत नवीन डॉक्‍टरच यायला तयार नसल्याने संबंधित डॉक्‍टरांच्या रिक्त पदांच्या जागी नवीन भरतीच होत नाही.  त्यामुळे आरोग्यसेवेवरही त्याचा परिणाम होवू लागल्याने आरोग्यसेवाच ‘सलाईन’वर जाण्याची वेळ आली आहे.   

ना सुटी... ना रजा... 

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांत दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, अनेक केंद्रांत सध्या एकच डॉक्‍टर असल्याने त्यांना रुग्णांना सेवा देताना मर्यादा येत आहेत. डॉक्‍टरांची संख्याच मर्यादित झाल्याने ‘ना रजा, ना सुटी’ अशी स्थिती त्यांची झाली आहे. त्यामुळे त्यांचीही प्रामाणिक काम करण्याची मानसिकता राहात नसल्याचे चित्र आहे.
 
आणखी दोन पदे रिक्त होणार 
सेवानिवृत्तीच्या वयानुसार जिल्ह्यातील पुसेगाव व कोळे येथील दोन वैद्यकीय अधिकारी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे तेथील रिक्त पदांच्या संख्येत भर पडणार आहे. त्यामुळे तेथेही डॉक्‍टरांची कमतरताच भासणार आहे.

आरोग्यसेवेवर परिणाम
सध्या जिल्ह्यातील तब्बल ३२ डॉक्‍टरांची पदे रिक्त झाली आहेत. संबंधित ७१ आरोग्य केंद्रांचा कारभार १२० डॉक्‍टरांवरच सुरू आहे. त्यातील काही डॉक्‍टर प्रशिक्षण, यात्रा-जत्रा, अन्य उपक्रमासाठी पाठवले जातात. परिणामी उपलब्ध डॉक्‍टरांवरच रुग्णसेवेचा भार पडत आहे.

Web Title: civil hospital issue