‘सिव्हिल’मध्ये पाणीटंचाई नेहमीचीच

प्रविण जाधव
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

सातारा - उपचाराच्या समस्यांबरोबरच पाणीटंचाई हाही जिल्हा रुग्णालयात नेहमी भेडसावणारा प्रश्‍न आहे. रुग्ण व नातेवाईकांना पिण्याबरोबर गरम पाणीही उपलब्ध होत नाही. वारंवार होणाऱ्या या त्रासाबद्दल मार्ग काढणे आवश्‍यक आहे.

सातारा - उपचाराच्या समस्यांबरोबरच पाणीटंचाई हाही जिल्हा रुग्णालयात नेहमी भेडसावणारा प्रश्‍न आहे. रुग्ण व नातेवाईकांना पिण्याबरोबर गरम पाणीही उपलब्ध होत नाही. वारंवार होणाऱ्या या त्रासाबद्दल मार्ग काढणे आवश्‍यक आहे.

येथील जिल्हा रुग्णालयामध्ये दररोज हजाराभर रुग्ण बाह्य रुग्ण विभागात उपचारसाठी येतात. त्याचबरोबर ३०० ते ३५० रुग्ण उपचारासाठी आंतररुग्ण विभागातील विविध वॉर्डमध्ये दाखल असतात. त्यामुळे रुग्णालयाची स्वच्छता, तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पिण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर पाणी लागते. डायलिसिस विभागासाठीही पाणी ही अत्यावश्‍यक बाब आहे. मात्र, योग्य नियोजनाअभावी अनेकदा रुग्णालयात पाणीटंचाई होते. त्यामुळे पाण्याअभावी साफसफाई रखडल्यास आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होतो. रुग्णालय परिसरात दुर्गंधी पसरते. शस्त्रक्रिया गृह, प्रसूती विभाग, भाजलेल्या रुग्णांचा वॉर्डमध्ये, तर कर्मचारी, रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची तारांबळ उडते. 

रुग्णालयातील पाण्याची आवश्‍यकता विचारात घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने स्वतंत्र लाइन दिली. मात्र, त्याला वारंवार अडथळे निर्माण होतात. त्यामुळे टॅंकरने पाणी आणावे लागते. सध्या त्यावर मार्ग काढण्यात आला आहे. मात्र, कायमस्वरूपी हा प्रश्‍न उद्‌भवू नये, यासाठी नियोजन आवश्‍यक आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही जिल्हा रुग्णालयात महत्त्वाचा आहे.

मात्र, रुग्णालयातच पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था नाही. धुणे व पिण्यासाठी एकच पाणी वापरले जाते. त्यामुळे आजार बरा होणार, की बळावणार असा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. डॉ. जगदाळे हे जिल्हा शल्यचिकित्सक असताना रुग्ण व नातेवाईकांसाठी प्रत्येक वॉर्डजवळ वॉटर फिल्टर बसविण्यात आले होते. मात्र, आता ते गायब झाले आहेत. त्यामुळे विकतच्या पाण्यावर रुग्ण व नातेवाइकांना अवलंबून राहावे लागत आहे. तीच अवस्था गरम पाण्याची आहे. शस्त्रक्रियेचे रुग्ण, प्रसूती कक्षातील महिला व बर्न वॉर्डमध्ये पूर्वी रुग्णांना अंघोळीसाठी गरम पाणी दिले जात होते. ते गिझरही बंद आहेत. त्यामुळे गरम पाण्याची आवश्‍यकता असलेल्यांनाही बाहेरून पाणी आणावे लागत आहे.

पाणी येत नसल्याने जिल्हा रुग्णालयात अनेक अडचणींना सामना करावा लागतो. त्यामुळे टॅंकरने पाणी आणले जाते; परंतु ही तात्पुरती उपाययोजना आहे. पाणीपुरवठा सुरू होण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. रुग्णांच्या आरोग्याचा विचार करून त्यांनी तातडीने मार्ग काढावा
- डॉ. उज्ज्वला माने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा

Web Title: Civil Hospital Water Shortage