सोलापूर - नगरसेवक व कामगार नेत्यांमध्ये कलगीतुरा 

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 10 जुलै 2018

सोलापूर : ई लिलावावरून गाळेधारकांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली असताना, याच मुद्यावरून आता नगरसेवक आणि कामगार नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. एकमेकावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. 

सोलापूर : ई लिलावावरून गाळेधारकांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली असताना, याच मुद्यावरून आता नगरसेवक आणि कामगार नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. एकमेकावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत. 

बहुजन समाज पक्षाचे गटनेते आनंद चंदनशिवे आणि कामगार कृती समितीचे अध्यक्ष अशोक जानराव यांच्यात जोरदार शाब्दीक खडाजंगी सुरु झाली आहे. चंदनशिवे यांनी सुरवातीपासूनच आयुक्तांनी घेतलेल्या ई लिलाव निर्णयाच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेला भाजप वगळता इतर सर्वपक्षीयांसह व्यापाऱ्यांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाची धार तीव्र झाली आहे. शहरातील सर्व गाळेधारक एकत्रित आल्याने आंदोलन चिघळण्याची स्थिती निर्माण झाली असतानाच, जानराव यांनी आयुक्तांच्या भूमिकेला पाठिंबा देत ई लिलाव झालाच पाहिजे अशी भूमिका जाहीर केली आहे. आयुक्तांना पाठिंबा देण्यासाठी बुधवारी महापालिका कर्मचाऱ्यांचा मोर्चाही आयोजित केला आहे. 

चंदनशिवे व जानराव हे बहुजन समाज पक्षाचे कार्य करतात. मात्र या आंदोलनात या दोघांनीही पक्ष बाजूला ठेवून आपापल्या पद्धतीने भूमिका घेतली आहे. त्यामुळे पक्षाच्या दृष्टीकोनातून पाहताना आपापली भूमिका आक्रमक मांडण्याकडे या दोघांचाही कल वाढला आहे. कामगारांच्या मोर्चाला तीव्र विरोध करून, आताच मोर्चा काढण्याचे का आठवले, असा प्रश्‍न चंदनशिवे यांनी उपस्थित केला आहे. तर, महापालिका कर्मचाऱ्यांचा पगार तीन-तीन महिने झाला नव्हता,त्यावेळी चंदनशिवे कुठे गेले होते, असा प्रश्‍न जानराव यांनी उपस्थित केला आहे. 

आयुक्तांनी नेहमीच कामगारांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. ते आल्यापासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना सर्वाधिक त्रास झाला आहे. त्यांच्यामुळे अनेक रोजंदारी कर्मचारी घरी गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थनासाठी कामगारांचा मोर्चा कशाला? 
- आनंद चंदनशिवे, गटनेता, बसपा 

महापालिकेस किरकोळ भाडे देऊन, वर्षानुवर्षे गाळेभाड्याची पोटभाडेकरूंकडून मलई खाणाऱ्या व्यापाऱ्यांचा पुळका कशाला? विश्‍वस्त म्हणून काम करणारेच चुकीची भूमिका घेऊ लागले तर, महापालिकेचे उत्पन्न वाढणार कसे? 
- अशोक जानराव, अध्यक्ष 
महापालिका कामगार कृती समिती 

Web Title: clash between corporator and union leaders