सोलापूर महापालिकेत आता महापौर विरुद्ध आयुक्त

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 31 मार्च 2018

सोलापूर : महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांतील गटबाजीचे किस्से राज्यभर गाजत असताना आज महापौर विरुद्ध आयुक्त असा नवा वाद निर्माण झाला. आयुक्त मस्तवाल झाले असून, अहंकारी व हेकेखोरही आहेत, असा सनसनाटी आरोप महापौर शोभा बनशेट्टी यांनी केला. दरम्यान, भाजपमधील धुसफूस आजही कायम असल्याचे दिसून आले. कोरमअभावी सभा तहकूब करून महापौर सभागृहाबाहेर गेल्यावर भाजपचे सदस्य सभागृहात आले.

सोलापूर : महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांतील गटबाजीचे किस्से राज्यभर गाजत असताना आज महापौर विरुद्ध आयुक्त असा नवा वाद निर्माण झाला. आयुक्त मस्तवाल झाले असून, अहंकारी व हेकेखोरही आहेत, असा सनसनाटी आरोप महापौर शोभा बनशेट्टी यांनी केला. दरम्यान, भाजपमधील धुसफूस आजही कायम असल्याचे दिसून आले. कोरमअभावी सभा तहकूब करून महापौर सभागृहाबाहेर गेल्यावर भाजपचे सदस्य सभागृहात आले.

आज होणाऱ्या सभेत शहरातील उड्डाणपूल आणि ड्रेनेज या अतिशय महत्त्वाच्या आणि शहराच्या विकासाला चालना देणाऱ्या योजनांबाबत निर्णय होणे अपेक्षित होते.
मात्र सभा तहकूब झाल्याने त्या विषयावर निर्णय झाले नाहीत. परिणामी या योजना पुन्हा रखडण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, सभा संपल्यावर महापौर बनशेट्टी भलत्याच संतप्त झाल्या होत्या. सत्ताधाऱ्यांतील गटबाजीमुळे शहर विकासाचे निर्णय होऊ शकले नाहीत, हे आणखी किती दिवस चालणार, असे त्यांना विचारले असता, त्यांनी थेट आयुक्तांवर शरसंधान केले. 

महापौर बनशेट्टी म्हणाल्या, ''महापौरांच्या पत्राला आयुक्त उत्तरे देत नाहीत. त्यांना भेटायला गेलेल्या नगरसेवकांना वाट पहात थांबावे लागते. नगरसेवकांनी वेळ घेऊन भेटायला यावे, असे सांगितले जाते. ते मस्तवाल झाले आहेत, अहंकारी आणि हेकेखोरही आहेत. आम्हीही कमी नाही. अंदाजपत्रक वेळेत होण्यासाठी ते 31 मार्चच्या सभेत येणे अपेक्षित होते. मात्र आयुक्तांनी ते जाणीवपूर्वक सभागृहाकडे पाठवले नाही. ज्या गृहप्रकल्पाचे बांधकाम बेकायदेशीर आहे, असे उघडपणे बोलायचे आणि त्याच बांधकामाच्या ठिकाणी जाऊन तेथील महोत्सवात सहभागी व्हायचे. कामचुकार कर्मचार्यांना पाठीशी घालायचे. त्याचवेळी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मानधनावरील कर्मचार्यांना कमी करण्याचे आदेश काढायचे, असे प्रकार आयुक्तांनी सुरु केले आहेत. त्यांच्या या कारभाराबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे.''

महापालिकेत सत्ता आल्यापासून पालकमंत्री विरुद्ध सहकारमंत्री समर्थक नगरसेवकांची गटबाजी पाहून कंटाळलेल्या सोलापूरकरांना महापौर विरुद्ध आयुक्त हा नवीन वाद पाहायला मिळाला. या घडामोडीत काँग्रेस आणि बसपच्या नगरसेवकांनी आयुक्तांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्त कायद्यातील तरतुदीप्रमाणे काम करीत आहेत. त्यामुळे त्यांचा विरोधात कुणी कटकारस्थान करीत असतील तर ते खपवून घेणार नाही, अशी भूमिका काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे आणि बसपचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी मांडली. 

त्याचवेळी विरोधी पक्षाचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते किसन जाधव यांनी मात्र आयुक्तांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करीत, भुयारी गटार योजनेत गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवला.

मी मस्तवाल नाही, अहंकारीही नाही : आयुक्त
मी मस्तवाल नाही आणि अहंकारीही नाही, असे आयुक्त डॅा. अविनाश ढाकणे यांनी सांगितले. ते म्हणाले, मी कार्यालयातील शिपाय़ांशी सौजन्याने वागत असेल तर
पदाधिकार्यांसमेवत मस्तवालपणे कसा वागेन. अहंकारी तर मुळीच नाही. मी वर्षभरात अहंभावाने वागल्याचे एकतरी उदाहरण कुणीही द्यावे. महापौरांनी मला मस्तवाल का
म्हटले हे मला माहित नाही. एखादा चांगला गृहपकल्प सोलापुरात होत असेल तर तेथील कार्यक्रमास उपस्थित राहणे गैर नाही. त्या ठिकाणी काही गैर असेल तर त्यावर
आजही कारवाई केली जाईल, त्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन, असेही डॅा. ढाकणे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Clashes between Solapur Mayor and Municipal Commissioner