वय वर्षे चौदा, देश फिरला अठरा!

संभाजी गंडमाळे
मंगळवार, 23 मे 2017

ज्ञानाच्या विविध प्रांतात लीलया रमणारा जोतिरादित्य

ज्ञानाच्या विविध प्रांतात लीलया रमणारा जोतिरादित्य
कोल्हापूर - आजवर अख्खा युरोप फिरलो... तब्बल अठरा देशांत जाऊन आलो...पण मला देशासाठी शास्त्रज्ञच व्हायचे आहे आणि त्यासाठी परदेशातील अनेक गोष्टींचा अभ्यास करतो आहे. फुटबॉल, क्रिकेट, जलतरणात पारंगत आहेच; पण रोबोटस्‌ बनवतो, इलेक्‍ट्रिक कार, थ्री डी प्रिंटिंग अशा अनेक क्षेत्रांतले विविध प्रोजेक्‍टस्‌ही करतो...केवळ चौदा वर्षांचा हा मुलगा तितक्‍याच आत्मविश्‍वासाने बोलत असतो आणि लगेच आता पुन्हा रेन्सलर पॉलिटेक्‍निक इन्स्टिट्यूट या अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या संस्थेत ‘एरो स्पेस इंजिनिअरिंग समर प्रोग्राम’साठी चाललोय, असंही सांगून जातो... जोतिरादित्य दिनेश चव्हाण हे या यशोलौकिकाच्या शिलेदाराचं नाव. 

दहावीच्या व्हेकेशनमध्येच त्याने ‘आयआयटी’सारख्या मानांकित संस्थेत इलेक्‍ट्रिक कार, थ्री डी पेंटिंगचे प्रोजेक्‍ट पूर्ण केले. मुळात इतक्‍या कमी वयात त्याला ही संधी मिळाली आणि त्याने त्याचे सोने केले. लवकरच ‘आयआयटी’च्या ब्लॉगवर हे प्रोजेक्‍टस्‌ झळकतील. वयाच्या चौथ्या वर्षापासून विविध क्षेत्रांत रममाण होत असताना त्याने अभ्यासाकडेही दुर्लक्ष केलेले नाही. 

केंब्रिज विद्यापीठाच्या आयजीसीएसई बोर्डाच्या दहावी परीक्षेत तो टॉपर ठरला आहे. फिजिक्‍स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या चार विषयांत त्याने ‘ए’ स्टार मिळवला आहे. तसा हा अभ्यासक्रमही अवघड आणि त्यामुळेच तब्बल चार स्टारचे यशही तितकेच मोठे आहे. शांतिनिकेतन स्कूलमध्ये दुसरीत शिकत असतानाच तो सायन्स, मॅथ्स, सायबर ऑलिम्पियाड परीक्षा देऊ लागला आणि पदकांची लयलूट करू लागला.

आजवरची त्याची ही पदकं आणि प्रशस्तिपत्रेच दोन पोती भरतील एवढी आहेत. भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचीही त्याने नवी दिल्लीत भेट घेतली. त्यांनी ‘आवडत्या क्षेत्रात झोकून देऊन काम कर आणि देशाचा गौरव वाढव’, अशी दिलेली शाब्बासकी आणि हीच प्रेरणा घेऊन त्याची पुढची वाटचाल सुरू आहे. आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळा ठसा उमटवायचा असेल तर आयसीसीएसई बोर्डातून दहावीची परीक्षा द्यायची, म्हणून तो संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये दहावीला आला आणि वर्ल्ड रोबोटिक ऑलिम्पियाडची तयारी करू लागला. 

अमेरिकेतील ‘नासा’ मध्ये जाऊन हवाई उड्डाणाचा आणि झिरो ग्रॅव्हिटीचा त्याने अनुभव घेतला. अमेरिकेतीलच प्रसिद्ध ‘एमआयटी’मधून रोबोटिक्‍सचे ट्रेनिंग घेतले. आयआयटी-दिल्लीपासून ते युरोपियन सेंटर फॉर न्यूक्‍लिअर रिसर्च येथील अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांत जाऊन त्याने प्रशिक्षण घेतले. आजही या साऱ्या प्रवासाबरोबरच रोज एक तास जिममध्ये आणि एक तास जलतरण असा त्याचा व्यायाम न चुकता सुरू असल्याचे तो सांगतो.

फुटबॉलचं बदलतं तंत्र
जोतिरादित्य हा येथील कृष्णा हॉस्पिटलचे डॉ. दिनेश व डॉ. क्रांती चव्हाण यांचा मुलगा. त्यामुळे कोल्हापूरच्या पेठेतला फुटबॉल त्याच्या लहानपणापासूनच आवडीचा विषय. साहजिकच तो फुटबॉलकडे वळला. दहावीच्या परीक्षेपूर्वी एक महिना अगोदर तो फुटबॉल स्पर्धेसाठी थेट जर्मनीला जाऊन आला. पंधरा वर्षांखालील गटात आर्सेनल सॉकर क्‍लबचा कर्णधार म्हणून त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. युक्रेन, हॉलंड, जर्मनी, रोमानिया, अर्जेंटिना, ग्रीस, स्पेन या संघांशी त्याने सामना केला. या खेळातील जगभरातील बदलते प्रवाह आणि तंत्र त्याने या स्पर्धेच्या माध्यमातून अवगत केले.

‘एसआयएलसी’ प्रोग्रामचा फायदा
सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर- ‘एसआयएलसी’चे अनेक प्रोग्राम जोतिरादित्यने पुण्यात जाऊन पूर्ण केले आहेत. या प्रशिक्षणाचाही आजवरच्या प्रवासात मोठा फायदा झाल्याचे तो सांगतो.

Web Title: claver student jyotiraditya chavan