'स्वच्छ'मध्ये इस्लामपूर देशात 17 व्या स्थानावर

धर्मवीर पाटील
शनिवार, 23 जून 2018

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात आता नव्याने 'स्टार रँकिंग' प्रणाली अवलंबली जाणार आहे. फर्स्ट ते सेव्हन स्टार प्रकारात मूल्यमापन होईल. त्यानुसार गुण आणि निधी मिळेल. यापुढे जुन्या यशात सातत्य टिकवून नव्याने हे स्टार मिळविण्यासाठी पालिकेला प्रयत्न करावे लागणार आहेत. 

इस्लामपूर : शासनाच्या 'स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2018' अंतर्गत इस्लामपूर शहर देशातील 1600 शहरांमध्ये 17 व्या क्रमांकाचे शहर ठरले आहे. महाराष्ट्रात हेच शहर आठव्या क्रमांकावर आहे. तर जिल्ह्यातील विटा शहर २५ व्या तर तासगाव ६३ व्या क्रमांकावर आहे. आज दुपारीच केंद्र शासनाने वेबपोर्टलवर ही शहरांच्या क्रमवारीची यादी जाहीर केली. पहिल्या २० शहरात आल्याने इस्लामपूरला ५ कोटींचे बक्षिस मिळणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. 'सिटीझन फीडबॅक'च्या आधारावरच हे यश मिळाले. कारण त्यात १४०० पैकी १२६८ इतके गुण मिळाले आहेत. देशाच्या पश्चिम झोनमधील सुमारे ४१५० शहरांच्या यादीत इस्लामपूर आघाडीवर होते. परंतु देशात १७ व्या स्थानावर येण्याची कमाल अंतिम टप्प्यात झाल्याने नागरिकांचा उत्साह वाढला आहे.

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जन्मशताब्दीनिमित्त २ ऑक्टोंबर २०१९ पर्यंत संपूर्ण भारत स्वच्छ आणि हगणदारीमुक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी “स्वच्छ सर्वेक्षण २०१८” ही मोहीम राबविण्यात येत आहे. 

व्यापक स्वरुपात नागरिकांचा सहभाग, सर्व स्तरातील लोकांमध्ये जागृती निर्माण करून सांघीक कार्याचे महत्त्व पटवून देणे, शहरातील वास्तव्य सुखकारक व्हावे. यासाठी शहरे स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांना चांगल्या सुविधा पुरविणे, त्याबाबतीत शहरांमध्ये निकोप स्पर्धेची प्रेरणा निर्माण व्हावी, हा अभियानाचा हेतू आहे. ही स्पर्धा ४००० गुणांची होती. इस्लामपूर पालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणात प्रचार मोहीम राबवून हे यश मिळवले. 

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात आता नव्याने 'स्टार रँकिंग' प्रणाली अवलंबली जाणार आहे. फर्स्ट ते सेव्हन स्टार प्रकारात मूल्यमापन होईल. त्यानुसार गुण आणि निधी मिळेल. यापुढे जुन्या यशात सातत्य टिकवून नव्याने हे स्टार मिळविण्यासाठी पालिकेला प्रयत्न करावे लागणार आहेत. 

"शहरातील नागरिक आणि प्रत्येक घटकाच्या प्रयत्नांतून हे यश मिळाले आहे. यापुढे यात सातत्य ठेवणे हे आव्हान आम्हा सर्वांना मिळून पेलावे लागणार आहे."
- नगराध्यक्ष निशिकांत पाटील.

"स्वच्छ सर्वेक्षण अभियानात राजकिय पदाधिकारी, नागरिक, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर्स, अभियंते, सेवाभावी संस्था, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, महिला बचतगट, पालिका कर्मचारी यांचे योगदान मोलाचे ठरले."
- दीपक झिंजाड, मुख्याधिकारी, इस्लामपूर नगरपरिषद.

Web Title: In Clean City Islampur is on17th in the country