पुरानंतर कऱ्हाडकरांनी सुरू केली साफसफाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

पुराचे पाणी खाली होईल तसे नागरी भागात पालिकेचे आरोग्य कर्मचारी साफ सफाई करू लागले आहे. शहरात सुमारे शंभरापेक्षा जास्त कर्मचारी स्वच्छतेसाठी राबत आहेत.

कऱ्हाड : महापुराने वेढलेल्या कऱ्हाड शहरासह तालुक्यातील पुरस्थिती आता ओसरू लागली आहे. पूरपरिस्थिती आटोक्यात येऊ लागल्याने पालिकेनेही पहाटेपासून स्वच्छतेची मोहिम मोठ्या जोमाने हाती घेतली आहे. पुराचे पाणी खाली होईल तसे नागरी भागात पालिकेचे आरोग्य कर्मचारी साफ सफाई करू लागले आहे. शहरात सुमारे शंभरापेक्षा जास्त कर्मचारी स्वच्छतेसाठी राबत आहेत. त्यासाठी बारा वेगवेगळी पथके तयार केली आहेत. पुरग्रस्त भागातील स्वच्छता त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणची स्वच्छता होण्यास हातभार लागला आहे. नागरीकांकडूनही त्याचे स्वागत होत आहे. 

पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यशवंत डांगे यांच्या नेतृत्वाखील स्वच्चता मोहिम जोरात सुरू आहे. शहरातील सुमारे तीस टक्के भाग पाण्याखाली होता. त्यातील किमान निम्मा भागातील पुराचे पाणी ओसरले आहे. पुराचे पाणी सुमारे पाच फुटाने घटले आहे. त्यामुळे नागरी भागात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसते आहे. त्याची त्वरीत साफ सफाई करण्यासाठी पहाटेपासून पासून पालिकेचे कर्मचारी राबत आहेत. त्यासाठी सुमारे शंभर कर्मचाऱ्यांची बारा पथके तयार करण्यात आली आहे. त्या प्रत्येक पथकात एक मुकादम व पाच कर्मचारी साफ सफाईसाठी ठेवण्यात आले आहेत. त्याशिवाय कचरा वाहून नेण्यासाठी दोन ट्रॅक्टर स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. त्याशिवाय किटकनाशक फवारण्यासाठी स्वतंत्र पथके केली आहेत.

पुराच्या पाण्यातून आलेली घाण स्वच्छ केली जात आहे. त्यामुळे शहरात पुर ओसरताना स्वच्छता अनुभवयास येत आहे. पुर ओसरल्यानंतर कशी साफ सफाई करावी, यासाठी दोन दिवस आधीपासून मुख्याधिकारी श्री. डांगे यांनी नियोजन केले होते. त्यानुसार पहाटेपासून पुराचे पाणी ओसरत असतानाच पालिकेने प्रत्यक्षात साफ सफाईच्या कामाला सुरवात झाली. पालिकेची स्वच्छतेबाबातची दक्षता पाहून लोकांनाही त्याबाबत समाधान व्यक्त केले. पुराखाली गेलेला नदीकाठचा भागात स्वच्छता राबविली जात आहे. त्यासाठी घाटापासून त्याची सुरवात करण्यात आली. त्यात शुक्रवार पेठ, पायऱ्या खालील भाग, यशवंत हायस्कूलचा मागील भाग, पाचण कॉलनी, दत्त चौक, शाहू चौक, दूध गंगा कॉलनी ते कोल्हापूर नाका व पुन्हा दत्त चौकातून थेट कृष्णा नाका परिसरात स्वच्छता केली जात आहे. सोमवार पेठ, कुंभार पाणंद, स्मशान भूमी, कमळेश्वर मंदीर आदी परिसरात नागरी वस्तीजवळ पाणी आले होते. तेथील त्वरीत साफसफाई करण्याचे काम सुरू होते. पाणी फुटाने कमी होत होते, तसतशी साफ सफाईही होताना दिसत होती. अनेक ठिकाणी नगरसेवकही कार्यरत होते. त्यात आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर यांनाही स्वच्छता मोहिमेत हातभार लावला होता. 

पुराच्या पाण्यामुळे मोठी अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे दुर्गंधीसह रोगराई पसरण्याची शक्यता आहे. ती गोष्ट लक्षात पालिकेने स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. पहाटे पासून सुमारे शंभर कर्मचारी स्वच्छता करत आहेत. त्यात नागरीकांनी काळजी घ्यावी. पालिकेचा आरोग्य विभाग तत्पर आहे. नजरचुकीने कुठे स्वच्चता राहिली असल्यास त्वरीत पालिकेत त्याची माहिती द्यावी.

- यशवंत डांगे, मुख्याधिकारी, कऱ्हाड पालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cleaning starts in Karhad after flood situation