सकाळच्या बातमीनंतर बाळे स्मशानभूमीत स्वच्छता

solapur.
solapur.

सोलापूर - बाळे स्मशानभूमीत कचरा टाकून स्मशानभूमीला "डंपिंग ग्राऊंड'चे स्वरूप आल्यासंदर्भातील बातमी "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्यावर महापालिका प्रशासनाने तातडीने सर्व कचरा हटविला.

अंत्ययात्रेच्या वेळी जमा होणारे साहित्य टाकण्यासाठी ठराविक ठिकाणी कचरा पेटी ठेवण्यात आली आहे. दफनभूमीवरीलही कोंडाळे हटविण्यात आले. दरम्यान, "इतरत्र "थंब'केल्यास पगार होणार कपात' या बातमीची कात्रणे महापालिकेच्या विविध कार्यालयातील "थंब'यंत्राजवळ सोमवारी लावण्यात आली. 

मोक्ष मिळण्याच्या स्मशानभूमी परिसरात कचरा कोंडाळे ठेवून अक्षरशः कचरा डेपोचे हिडीस स्वरूप आणले होते. धक्कादायक म्हणजे, ज्या ठिकाणी मरण पावलेल्या व्यक्तींना दफन करण्यात आले आहे, त्यावरही लोखंडी कोंडाळे ठेवण्यात आले होते. स्मशानभूमीत कचरा कंटेनर ठेवल्यामुळे दृश्‍य अतिशय ओंगळवाणे दिसू लागले, शिवाय घंटागाड्यांची वर्दळ वाढल्यामुळे अंत्यसंस्काराला येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागला. या संदर्भातील "ऑन दि स्पॉट' बातमी प्रसिद्ध झाल्यावर प्रशासनाने तातडीने दखल घेत कोंडाळे हटविली, शिवाय परिसरही स्वच्छ केला. कोंडाळे न हटविल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा बसपचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी दिला होता. 

कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी महापालिकेत "बायोमेट्रिक' सुविधा करण्यात आली आहे. मात्र, त्याचा फायदा होण्याऐवजी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा सुरू झाला. त्यांच्या सोईनुसार कोणत्याही कार्यालयात थंब करण्याचे प्रकार सुरू झाले. या संदर्भात "सकाळ'मध्ये बातमी प्रसिद्ध झाल्यावर आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी तातडीने दखल घेत, इतरत्र थंब करणाऱ्याची यादी बनविण्याचे आदेश दिले. इतकेच नव्हे तर, ज्यांनी इतरत्र थंब केले आहे, त्यांचा पगार कपात करण्याच्या सूचनाही दिल्या. त्यामुळे आपल्याच "धुंदीत' वागणारे अधिकारी-कर्मचारे जमिनीवर आले. 

पगार "कट' होणार वाचल्यावर कर्मचारी परतले 
महापालिकेच्या काही कार्यालयांत "इतरत्र "थंब' केल्यास पगार "कट' होणार' या बातमीच्या छायांकित प्रती ठळकपणे लावण्यात आल्या होत्या. नियुक्त कार्यालय सोडून सोईच्या कार्यालयात थंब करण्याची सवय पडलेले काही अधिकारी व कर्मचारी सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे थंब करण्यासाठी आले. पण त्याठिकाणी "पगार कट'ची बातमी वाचल्यावर निमूटपणे परतले. ते पाहिल्यावर "थंब'मुळे नेहमी वाद होण्याचे प्रकार थांबल्याने त्या कार्यालयातील कर्मचारीही सुखावले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com